जय श्रीराम
नमस्कार.
०९-डिसेम्बरच्या प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात की - "दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे". याची प्रचिती मला नितीनदादाने खालील अनुभवातून दिली.
मी एका ठरलेल्या सर्विसिन्ग सेंटरमध्ये कार सर्विसिन्गला टाकत असे. प्रत्येक वेळी तिथले लोक मला कारचे एअर-फिल्टर बदलू का असे विचारत असत. मी कधी त्यांना होकार देऊन फिल्टर बदलून घेत असे तर कधी नकार देत असे. पण मला असे वाटायचे की हे लोक मला फसवतात. दर वेळी कार सर्विसिन्गला टाकल्यावर एअर-फिल्टर कसे खराब झालेले असेल? मला असेही वाटायचे की हे लोक माझ्याकडून फिल्टर बदलायचे पैसे तर घेतात पण प्रत्यक्षात फिल्टर बदलतात की नाही कोणास ठाऊक. असेच एकदा मी कार सर्विसिन्गला टाकायला गेलो आणि तिथल्या लोकांनी मला एअर-फिल्टर व ट्रान्समिशन फ्लुइड बदलू का असे विचारले. ट्रान्समिशन फ्लुइड बदलण्याचा खर्च एअर-फिल्टर बदलण्यापेक्षा बराच जास्त होता. मी माझी बुद्धी चालवली आणि विचार केला की ट्रान्समिशन फ्लुइड खरंच खराब झाले असेल आणि बदलले नाही तर भविष्यात कार खराब होऊन जास्त पैसे खर्च होण्याचा संभव आहे. म्हणून मी ट्रान्समिशन फ्लुइड व एअर-फिल्टर हे दोन्ही बदलायला होकार दिला. पण मनात हेच विचार होते की ट्रान्समिशन फ्लुइड खरंच बदलले की नाही मला कसे कळणार, त्यामुळे फ्लुइड न बदलता देखील मला पैसे आकारून माझी फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. मी सर्विसिन्ग होईपर्यंत तिथेच वेटिंग रूम मध्ये थांबलो. कारचे काम पूर्ण झाले हे समजल्यावर पेमेंट काउंटरला गेलो आणि इन्व्हॉईस मागितले. इन्व्हॉईस मध्ये त्यांनी फक्त एअर-फिल्टर बदलण्याचे पैसे आकारले होते. मी त्यांना त्याबाबत विचारल्यावर मला सांगितले गेले की कारचे ट्रान्समिशन फ्लुइड लगेच बदलण्याईतके खराब झालेले नव्हते म्हणून त्यांनी फक्त एअर-फिल्टरच बदलले!
तेव्हा माझे डोळे उघडले व चूक लक्षात आली. माझ्या विचाराप्रमाणे सर्विसिन्ग सेंटर चे लोक मला फसवून ट्रान्समिशन फ्लुइड न बदलता किंवा गरज नसतानाही बदलून माझ्याकडून जास्त पैसे घेऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही आणि आवश्यक तेवढेच काम करून त्याचे पैसे मला आकारले होते.
या अनुभवातून नितीनदादानी मला जाणीव करून दिली की - कारचे कोणते काम करायचे आणि कोणते नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण काम करणारे लोक माझी फसवणूक करतात असा विचार मनात येणे हा माझ्या अशुद्ध मनाचा प्रत्यय आहे. माझा हा विचार खोटा ठरवून दादानी मला दाखवून दिले की कारचे काम करणारे लोक प्रामाणिक आहेत व दोष माझ्याच मनात आहे.
मी दादानी दिलेली ही शिकवण कितीही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी वेळोवेळी दुसऱ्याचे दोष दिसतातच पण दादाच्या कृपेने ही जाणीव होते की मन जितके लवकर शुद्ध व्हावे असे वाटत असेल तितके जास्त नाम घेतले पाहिजे.
सत्गुरुचरणी हीच प्रार्थना की आपल्याला आवडते तसे नाम करवून घ्या.
सत्गुरुनाथ महाराज की जय!
जय श्रीराम
22-06-2020 06:36 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : टॅम्पा, फ्लोरिडा, अमेरिका.