सत्गुरू श्री. नितीनदादांना साष्टांग नमस्कार.
जय श्रीराम
मी जुन-२०१६ मधे माझा मोठा मुलगा अभिजीत याच्याकडे अमेरिकेत फ्लोरीडाला गेले होते. त्यावेळेस श्री. नितीनदादा अमेरिकेतील ग्रीनव्हील येथे होते. अभिजीतने दादांना सत्संगासाठी ग्रीनव्हीलला येण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यावर आम्ही ग्रीनव्हीलला गेलो. आमचा मुक्काम एका हॉटेल मधे होता. एक दिवस आम्ही सत्संगाला जाण्यासाठी तयार झालो. पल्लवी आणि मैथिली (सून आणि नात) यांना तयार व्हायला थोडा वेळ होता म्हणून मी आणि अभिजीत पुढे निघालो. बोलता बोलता अभिजीत पुढे कार जवळ गेला आणि त्याच वेळेस मी पार्किंग एरिआ मधल्या स्पीड-ब्रेकर मध्ये पाय अडकून खाली पडले. पार्किंग एरिआ सिमेंटचा होता. त्यामुळे मी जोरात पडून खुप दुखापत होण्याचा संभव होता. दुखापती मुळे कदाचित त्यादिवशी किंवा पुढचे काही दिवस सत्संगाला सुद्धा जाता आले नसते. पण मी अशा रीतीने पडले की माझं डोकं कोणीतरी हळूहळू जमिनीवर टेकवतं आहे अशी स्पष्ट जाणीव झाली आणि मला साधे खरचटले सुद्धा नाही. तेवढ्यात अभिजीतने मला पडलेले पहिले व उठण्यासाठी हात दिला. हे ईतके अचानक घडले की मी कशी पडले हे मला सुद्धा कळले नाही. नंतर पल्लवी व मैथिली तिथे आल्या व आम्ही सगळे सत्संगासाठी श्री. नितीनदादांच्या घरी गेलो. मी दादांना नमस्कार करण्यासाठी वाकले तेव्हा दादांनी मला विचारले, "पाय खुप दुखतो का?" मला त्यावर काय उत्तर द्यावे हे कळले नाही, मी शांत राहिले. नंतर मी हॉटेलच्या कार पार्किंग मध्ये घडलेला प्रकार दादांना सांगितला व हेही सांगितले की तुम्हीच मला सावरले, नाहीतर मला खुप लागले असते. यावर दादा "हो" एव्हढंच म्हणाले. खरंतर काय घडले हे दादांना आधीच माहित होते व त्यांनीच मला सांभाळले याची पावती त्यांनी मला "पाय खुप दुखतो का?" हा प्रश्न विचारून आधीच दिली होती. त्यांच्या शिवाय भक्ताची एव्हढी काळजी कोण घेणार!
या अनुभवातून दादांनी मला जाणीव करून दिली की ते माझ्या सतत पाठीशी असतात, माझे संरक्षण करतात व त्यांचा सत्संग सुद्धा त्यांच्या कृपेशिवाय घडू शकत नाही. दादा नेहमी म्हणतात की नाम घेतल्याने कृपा होते.
धन्यवाद दादा.
जय श्रीराम
22-06-2020 11:57 am / POSTED BY : Vidya Kulkarni / Where the Experience took place : ग्रीनव्हील, अमेरिका