जय श्रीराम
एकदा दादांशी बोलताना त्यांना म्हंटले कि महाराजांनी मला खूप दिलंय. इतकं मिळण्याची माझी लायकी नाही. आपण सारेच पुष्कळ वेळा असं म्हणतो ते मनापासुनही असतं. ते आपल्या कल्पनेप्रमाणे खरेही असतं. पण दादांनी सांगितलेला सूक्ष्म विचार मला सुचला नव्हता. दादा म्हणाले, "व्यवहारात तुम्ही दाखवता आहात ती नम्रता योग्य आहे. पण महाराजांच्या बाबतीत आपण जरा चूक करीत आहोत. आपल्या सांगण्याचा एक अर्थ असा होतो कि महाराजांना कुणाला किती द्यावं कळत नाही, त्यामुळे ते लायकी नसताना देतात. पण सत्य हे आहे कि आपली लायकी काय आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला आपण काय काय साधन केले हे कुठे माहीत आहे? आपली आठवण फार फार तर ह्या जन्मापासूनची असू शकते. पूर्वजन्मात आपण काही साधन केले असेल त्याचीही फळे ह्या जन्मात मिळू शकतात. त्यामुळे ज्याला सूक्ष्मातलं दिसतं, कळतं त्याची गणितं वेगळी होतात. त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. म्हणून आपण असं बोलू नाही. महाराजांनी जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञाता जरूर असावी. ती साधनासाठी वापरावीही पण महाराजांच्या करण्यावर असे शेरे मारू नयेत."
मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी महाराजांची क्षमा मागितली आणि दादांना पुढचा प्रश्न विचारला. "दादा मी असं काय केलं असेल कि ज्यामुळे महाराजांनी मला ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी लायक ठरवले. ते जर कां मला कळले तर त्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा करता येतील." मला वाटले होते कि हा प्रश्न अवघड आहे. पण दादांनी त्याचे अगदी सहज उत्तर दिले आणि तेही बिनतोड.
दादा म्हणाले, "याचे उत्तर सोपं आहे. तुम्ही ज्या गोष्टी महाराजांना आवडतात त्या केल्या असणार या जन्मी नाही तर आधीच्या कुठल्यातरी जन्मात किंवा जन्मांमध्ये, पण केल्या असणार हे निश्चित. तुमच्या माहितीसाठी त्याही सांगून ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण, दुसरी अन्नदान, तिसरी सगुणोपासना, चौथी दुसऱ्याचं मन न दुखवणं आणि पाचवी जनप्रियत्व म्हणजेच निस्वार्थीपणा."
दादांनी माझ्या अवघड प्रश्नाचं असं सोप उत्तर दिलं. पण मी मात्र हे सगळं आपण कधी केलं, ह्या अवघड प्रश्नात बुडून गेलो. पण सावरलो आणि म्हंणलं केंव्हा का केल्या असेनात, महाराजांना आवडतात ना मग आपण यापुढे त्या गोष्टी करून महाराजांना प्रिय होऊयात."
जय श्रीराम
15-06-2020 06:37 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : पुणे