सद्गुरू नाथ महाराज की जय
महाराजांच्या दि.२८ मे रोजीच्या प्रवचनाचा विषय होता "प्रपंच भगवंताचा मानून करावा".
त्यामध्ये महाराजांनी दिलेल्या शिकवणीचा आलेला एक अनुभव -
माझ्या ऑफिस मध्ये मला सप्टेंबर २०१९ पासून माझ्या कामाव्यतिरीक्त एच्.आर.चे अतिरिक्त कामसुद्धा करायला सांगितलं आहे. पण त्या कामाचा अजिबातच गंध नसल्याने मी ते काम कायम तणावाखाली करायचे.
मी मॅनेजमेंटला सांगितलं की मला ह्या कामाचा अनुभव नाही तरीही ‘तुम्हीच करा हे काम’ असं वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
शेवटी मला हे निश्चित दिसलं की मी कितीही नाही म्हटले तरी एच्.आर.चे काम मीच पहावे ही महाराजांची ईच्छा होती.
माझी एक मैत्रीण माझ्या मागे लागली होती की मी एच्.आर.चे शिक्षण घ्यावे. तिनेच मला एक ऑनलाईन डिस्टन्स कोर्सची पोस्ट पाठवली. मी मार्च महिन्यात त्याबद्दल चौकशी केली. त्या सरांचं नाव आहे बी. के. इनामदार, पुणे. ते ६५ वर्षांचे आहेत.
क्लासच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला एच्.आर. कोर्सबद्दल त्यांनी माहिती सांगितली. त्यांच्या आवाजात एवढा गोडवा आहे की त्यांचे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते जसा दादांचा आवाज ऐकत रहावासा वाटतो.
त्या दिवशी मी त्यांना थोडी पार्श्वभूमी सुद्धा सांगितली की मी हा कोर्स का करतेय. मग ऑफिसमधून घरी आल्यावर सगळी घरची कामं उरकल्यावर रात्री १० ते ११ ची वेळ ठरवली क्लासची.
तेव्हा सगळे बोलणे झाल्यावर ते पटकन म्हणाले की ‘शिकाल तुम्ही. छान होईल सगळे. नामाच्या स्मरणात रहा.’ असे म्हंटल्यावर मी क्षणभर उडालेच आणि मी त्यांना पटकन म्हणाले की तुम्हाला कसं समजलं की मी नाम घेते. तर त्यावर सर म्हणाले की बोलण्यावरूनच समजतंय.
मी ईतकी सुखावून गेले की विचारू नका. मी आपली लगेच सुरूवात केली, गोंदवलेकर महाराज आणि दादांच्या आलेल्या अनुभवांबद्दल स्तुती करायला.
त्यादिवशी खरे सर्प्राईज तर नंतर होते.
माझे बोलणे झाल्यावर सर म्हणाले की मी सुद्धा गोंदवलेकर महाराजांचा भक्त आहे. आमचे आजोबा आणि वडिलांनी महाराजांना प्रत्यक्ष बघितले होते. त्यांच्या घराण्याचा घोडा पालखी पुढे नाचायचा आणि त्यांना वर्षातून एकदा महाराजांची सेवा करायचा मान मिळतो.
आणि मग म्हणाले की महाराजांनीच मला डेप्युट केलंय तुम्हाला मार्ग दाखवायला. तुम्ही शिकायची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता घाबरायचं नाही. महाराजांची कृपा आहे तुमच्यावर.
हे सगळं ऐकल्यावर मला काही सुचतंच नव्हते कि मी काय बोलू? माझ्याकडे शब्दच नव्हते बोलायला. मी नंतर सुयशला (मुलाला) सगळे सांगितलं; त्यालासुद्धा आश्चर्य वाटले.
मी फक्त शिकायची तयारी दाखवली आणि मला काय दिलंय महाराज आणि दादांनी ते व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नव्हते.
क्लासची दोन तीन लेक्चर्स झाली. पण ऑफिसमधून घरी आल्यावर रात्री १० वाजता शिकायला तेवढा ऊत्साह राहायचा नाही. मला थोडे टेन्शन आलेले की हे पूर्ण होईल का, मी शिकू शकेन का?
आणि......
पुन्हा एकदा महाराज आणि दादांनी चमत्कार दाखवला. कोरोना विषाणूची लागण जगात सगळीकडे झपाट्याने होत असल्याने २३ मार्च पासून आपल्या देशात लॉकडाऊन चालू झालाय तो आतापर्यंत. तसे बघायला गेले तर अत्यंत वाईट काळ चालू आहे. पण मी त्याची दुसरी बाजू बघतेय की मला जे शिक्षण घ्यायचे आहे ते मी फ्रेश मुडमध्ये आणि दिवसा कसे घेऊ शकेन याची सोय महाराज आणि दादांनी केली. त्यामुळे मी माझ्या वेळेनुसार हा कोर्स पूर्ण करू शकतेय दादांच्या 'नामाच्या आज्ञेत' राहून.
श्री राम जय राम जय जय राम
13-06-2020 05:37 pm / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : गोरेगाव, मुंबई