जय श्रीराम
दादांच्या कृपाप्रसादाने दोन वर्चुअल सत्संग गोव्यातील भक्तांसाठी हल्लीच जून महिन्यात झाले. पहिला ४ तारखेस झाला आणि दुसरा ५ तारखेस. मी फक्त ५ तारखेच्या सत्संगासाठी हजर होतो, कारण दादांच्या नियमानुसार (बँडविड्थचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून केलेला नियम) यावेळी एका कुटुंबाला एकदाच सत्संग करायची संधी मिळणार होती.
पुढे, ८ तारखेस दादांच्या एका भक्ताशी सहज बोलणे झाले. त्यांची ४ तारखेच्या सत्संगाला उपस्थिती होती. अल्पनाचा (माझी पत्नी) त्यांच्याशी संवाद चालला होता. मी काहीतरी बोलायचे म्हणून त्यांना प्रश्न केला की ४ तारखेच्या सत्संगात दादांनी काय सांगितले? काही क्षण शांतता होती मग त्यांचे उत्तर आले. आता काहीच आठवत नाही; नंतर आठवून सांगेन. नंतर पुढे एकमेकांची विचारपूस करून फोन ठेवला गेला.
ह्या घटनेला चार दिवस उलटल्यावर मनात एक विचार आला. आपण आधीच्या सत्संग विषयी जो प्रश्न त्या भक्तांना विचारला, त्याची काही आवश्यकता होती का?
प्रपंचात निस्वार्थी बनावे लागते आणि परमार्थात स्वार्थी (खऱ्या अर्थाने) बनले पाहिजे असे मागे दादांनी सांगितले होते. मग हा प्रश्न विचारण्यात माझा काही पारमार्थिक स्वार्थ होता का?
आणखी खोलात जाऊन विचार केल्यावर मला असे वाटले की मी हा प्रश्न विचारण्यात, परमार्थापेक्षा माझा प्रापंचिक स्वार्थच जास्त होता. दादांनी ४ तारखेला सत्संगात काहीतरी वेगळे सांगितले असेल आणि ते मला कळले पाहिजे (म्हणजे मला चुकले नाही पाहिजे) असा सुप्त हव्यास होता.
माझ्याकडून त्यावेळी असा विचार झाला नाही की माझ्या परमार्थासाठी जे योग्य आहे ते दादांना पूर्ण माहीत आहे. आणि माझ्या योग्यतेनुसार, माझ्या पचनी पडेल म्हणजे माझ्यासाठी योग्य असेल ते ज्ञान, योग्य वेळी माझे सदगुरू मला पुढे देतीलच पण त्यासाठी मी त्यांनी सांगितलेले साधन योग्य रीतीने केले पाहिजे.
मग दादांनी आधी कधीतरी सांगितलेले दासबोधातील पढतमुर्खाचे लक्षण आठवले; जे माझ्यासाठी तंतोतंत लागू पडत होते.
दादांनी महाराजांची प्रवचने वाचताना मागे सांगितलेले आठवले की महाराजांनी म्हटल्याप्रमाणे परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. समजा भोजनासाठी आपण काहीतरी पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या पाककृती वाचत बसलो. पण ही पाककृती बरी की ती बरी याचेच विस्लेषण करत बसलो आणि काही शिजवलेच नाही, तर त्या वाचनाचा काय उपयोग, शेवटी उपाशीच राहावे लागेल. तसे, मी दादांना अभिप्रेत असलेल्या पारमार्थिक स्वार्थासाठी प्रयत्न करायचे सोडून, मला आणखी वेगळे काय ऐकायला मिळेल याचीच वंचना मी करीत बसलो होतो. दादांच्या कृपेने मला माझी ही उणीव जाणवली.
दादांनी माझ्या मनात विचार घालून, मला मार्गदर्शन केले की मी नाम घेण्याची कृती करण्यात कमी पडत आहे.
जय श्रीराम
11-06-2020 01:33 pm / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : ८ जून, १०२०, नुवें, गोवा