जय श्रीराम
दादांना प्रेमाचा नमस्कार.
दादांच्या इच्छेने अभिजीत मैथिली आणि मी (जानेवारी २००५) ग्रीअरला दादांच्या गावी पोहोचलो. दादा आम्हाला एअरपोर्टला घ्यायला आले होते. एअरपोर्टबाहेर पडलो तोच दादांची गाडी समोरच होती. दादा गाडीतून उतरले आणि त्यांचं आपल्याला जिंकुन घेणारं smile देत "नमस्कार" अस मोठ्याने म्हणाले. आम्ही घरी पोहोचल्यावर दादांनी मैथिलीला कडेवर घेतलं आणि श्रीरामांसमोरची उदी तिच्या कपाळावर लावली. नंतर जरा settle झालो आणि living room मध्ये बसलो. मला दादांना बघितल्यापासून मी याआधी त्यांना भेटले आहे अशी खूप तीव्र भावना येत होती. मी दादांना म्हणाले की "दादा, मला तुम्हाला आधी भेटल्यासारखं वाटतंय." त्यावर लगेच दादा म्हणाले, "हो भेटलोय ना आपण, तुझे आधीचे जन्म सांगू का?".मी तर पुढे काही बोलूच शकले नाहीं. आता तुम्ही माझे झालात म्हणजे ते काही एका जन्मासाठी नाही, तर पुढे कायमचेच माझे झालात असं महाराज म्हणतात, असं दादा जेव्हा म्हणतात त्याचा हा प्रत्यय दिला. माझ्यासाठी हि पहिली भेट होती पण ती या जन्मीची. त्या एका वाक्यात दादांनी त्यांचं आणि माझं नातं हे खूप जुनं आहे हे दाखवून दिलं.
तेव्हा मैथिली ६ महिन्याची होती. दादांना भेटल्यावर तिचे हावभावचं बदलले होते. तिच्या डोळ्यात वेगळीच excitement दिसत होती. ती दादांकडे झेप घ्यायची त्यांच्याशी काहीतरी बोलतेय असे तिचे डोळे आणि चेहेरा असायचा. दादा तिच्याशी बोलले कि तर ती खूपच बोलायची (खूप आवाज करायची). ते तिचं वागणं बघुन मी दादांना विचारलं की "दादा, हिला आपलं बोलणं कळतं का?", त्यावर दादा हसून म्हणाले "तुमचं नाही, पण माझं कळतं." माझ्यासारखीच तिचीही ही दादांची झालेली पहिली भेट नव्हती त्यामुळे नक्कीच काहीतरी बोलत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि खाली आलो. मी अभिजीतला विचारले कि तू खाली येण्याआधी मैथिलीच्या डोक्याजवळ उशी लावलीस का जेणेकरून तिला भिंत लागणार नाही. तो म्हणाला, "आठवत नाही, मी जाऊन बघून येतो." तो खाली येऊन म्हणाला, "already उशी लावलेली होती कदाचित मीच लावली असेल पण लक्षात नसेल." आमचे हे सगळे बोलणे दादा ऐकत होते. दादा म्हणाले "त्यानी ठेवली." पुढे म्हणाले कीं ,आपल्या आयुष्यात बरेचदा अशीच मदत मिळते, गोष्टी जुळून येतात आणि आपण एकमेकांनी ते केले असेल, योगायोग असेल असे गृहीत धरतो आणि भगवंताचा हात त्यात न दिसल्याने त्याला Thank You पण म्हणत नाही. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक लहानातली लहान गोष्टसुद्धा त्यांच्या (सद्गुरुंच्या) इच्छेने घडते असा भाव ठेवला पाहिजे हि शिकवण ह्या प्रसंगातून दादांनी दिली.
दादांकडे अभंग सुरु होते, ते ऐकून मी त्या अभंगाच्या गायिका ह्या अमुक आहेत असा उल्लेख केला. लगेच मला टपली मिळाली. दादा म्हणाले, मी कोणत्या संतांनी लिहिलय ते बघतो, गायक नाही. आतापर्यंत काहीही ऐकले कि तो अभंग जरी असला तरी गायक आणि त्यांची गायकी याचीच स्तुती करायची सवय होती. नकळतपणे मी संतांच्या शब्दांपेक्षा गायकांना जास्त महत्व देत होते. दादांनी एक नवीन दृष्टीकोन दिला की कोणत्याही अभंगाची ओळख हि त्या संतांच्या नावाने असावी, गायकाच्या नावाने नाही आणि आपण संतांनी लिहिलेले अभंग शब्दांचे अर्थ समजून तो ऐकला पाहिजे मग तो कुणी आणि किती छान गायला याला महत्व रहात नाही.
पहिल्या भेटीतच दादांनी बरंच काही शिकवायला सुरुवात केली होती .
सद्गुरूनाथ महाराज की जय
जय श्रीराम
10-06-2020 02:30 am / POSTED BY : Pallavi Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर , अमेरिका