जय श्रीराम
प्रवचनातून दादा आपल्याला बऱ्याचदा सांगतात की स्तुती करताना समजून करावी, जे काही चांगलं दिलय ते महाराजांनी दिलय असे म्हणावे. खरं आहे, स्तुतीने आणि कर्तेपणा आपल्याकडे घेतल्याने अहंकाराच्या बीजाला खत-पाणी मिळते आणि तो फोफावतो - अगदी नकळत. महाराजांची कृपा असली कि ते कसे आपल्याला ह्यातून अलगद वाचवतात त्याचा हा मला आलेला अनुभव. महाराजांची कृपा कळायला मात्र आपण जागरूक असणे आवश्यक असते. दादांच्या शिकवणीनुसार आपण नामात आणि अनुसंधानात असलो कि परमार्थाला घातक हे प्रपंचातील बारकावे आपल्या लक्षात येतात आणि महाराज नौका पार नेतात.
झाले असे कि, माझ्याकडून दादांनी जो मागील एक शेअर लिहून घेतला तो खूपच आवडल्याने माझे कौतुक करावेसे देशमुख सरांना वाटले. त्यांनी प्रथम फोनवरूनच तोंडभरून स्तुती केली आणि चहाला पण बोलावले. ये संध्याकाळी मग बोलू अशी आज्ञा मिळाली. मी कर्तेपणा माझ्याकडे घेतला होता आणि स्वतःवर फारच खुश झालॊ होतो. अभिमान बळावला होता, नव्याने अहंकार वाढीस लागला होता. ५ मिनिटांवरतीच त्यांचे घर असल्याने मी पटकन हो म्हणालो. स्तुती कोणाला ऐकावीशी नाही वाटत? मी अजून परमार्थात कच्चा असल्याने हा विकार आहे हे पटकन लक्षात नाही आलं. महाराजांनी हात धरला होता, मी नामात होतो म्हटल्यावर त्यांनीच ह्यातून पार नेलं हे मात्र खरं.
त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता निघायची वेळ आली. तेवढ्यात महाराजांनी असे काही फासे फेकले कि सर्व प्लॅनच १ मिनटात चेंज झाला आणि दुसऱ्या दिवशीवर ढकलला गेला. म्हणजे आता माझी स्तुती ऐकायला २४ तासाचा अवधी होता. पण दुसऱ्या दिवशी घडले वेगळेच. आम्ही जेंव्हा भेटलो तेंव्हा अर्धा- पाऊण तास जनरल गप्पा झाल्या; पण स्तुती झालीच नाही. चक्क निघायची वेळ आली; मी निघालो तेंव्हा मॅडमना आठवलं आणि त्या म्हणाल्या अरे तुझे कौतुक करायचे राहूनच गेले की! काल वाट पहिली तुझी, खिचडी पण करून ठेवली होती. आणि त्यानंतर माझ्या तोंडून दादांनी जे बोलवून घेतलं ते काहीसं असं होतं - काल आलो असतो तर तुम्ही कौतुक करून मला (हरबऱ्याच्या) झाडावर चढवलं असत. माझा अभिमान वाढला असता. आधीच मी रोज दादांना प्रार्थना करतो की माझा अभिमान, विकार सगळं तुमच्या चरणाशी राहू द्या. मॅडम पण माझ्या रिस्पॉन्सवर हो देत म्हणाल्या अरे खरंच की - पहा ह्यातून पण दादांनी शिकवण दिली.
खरंच नामात राहायचा प्रयत्न करत असल्याने महाराजांनी मला सांभाळून घेतले होते. अहंकाराचा बीजांकुर डोके वर काढू पाहत होता तो खुडून टाकला होता. माझ्या प्रार्थनेला दिलेला हा महाराजांचा होकारच होता. दादा म्हणतात तसे - जे होते ते योग्यच आणि आपल्या कल्याणासाठीच असते ह्याचा प्रत्यय मिळाला. ह्यातून मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले कि आपण परमार्थ सावधान होऊन केला पाहिजे. विकारांपासून जपले पाहिजे आणि त्यांना परमार्थात, नाकी प्रपंच्यात वापरले पाहिजे.
जय श्रीराम
06-06-2020 04:56 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, २९-३० मे २०