आम्ही
गोवेकर मंडळी श्रीनितीनदादांना १४ जानेवारी, २०१९ ला प्रत्यक्ष भेटलो. त्याच्या
अगोदरही दादा आमच्या पाठीमागे अप्रत्यक्षरीत्या होते ही जाणीव आम्हां सर्वांना आता
येतेय. दादांना भेटून चौदा पंधरा दिवस झाले असतील, आम्ही काही मोजकीच भक्तमंडळी सत्संगासाठी दादांच्या गोव्याच्या
निवासस्थानी उपस्थित होतो. आतापर्यंत आम्हा सर्वांना दादांना येणाऱ्या स्वर्गीय
सुगंधाची अनुभूती एकदा तरी आली होतीच.
त्या दिवशी जे काही घडलं, नव्हे दादांनीच घडवून आणलं, ते अनाकलनीय होतं. ‘श्री राम जय
राम जय जय राम’ हा चॅन्ट सुरु होऊन पाच दहा मिनिटे झाली असतील, माझ्या समोरच साधरणतः एक मीटरच्या अंतरावरून अचानक सुगंधाच्या उकळ्या फुटायला
लागल्या आणि संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळाच सुगंध कोंदाटायला लागला; मी डोळे उघडले,
दादा आणि उपस्थित भक्तमंडळी नामांत आकंठ बुडून गेली होती, कुठून, काय होतंय हे कळत नव्हतं. सुगंध मात्र आणखी
आणखी तीव्र होत चालला होता. एक अद्वितीय, अतुलनीय, अनाकलनीय, स्वर्गीय आनंदात आम्ही सगळे बुडून गेलो
होतो. चॅन्ट संपला, दादांनी डोळे उघडले, दादांचे डोळे पाणावले होते, दादांनी ज्या जागेवरून सुगंधाच्या
उकळया येत होत्या तेथे लोटांगण घातले. दादा साष्टांग नमस्कार करून उठले; दादांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले होते. आम्हा
भक्तमंडळीत एक नीरव शांतता पसरली होती. दादा म्हणाले, “श्रीमहाराज
आले होते, ईकडे उभे राहून त्यांनी दर्शन दिले.” दादांच्या
चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होतं, आपल्या सदगुरूंचं प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचं.
मी उतावळ्या लहान मुलासारखा श्रीमहाराज जिथे उभे होते, जिथे
दादांनी साष्टांग नमस्कार घातला होता त्या जागेवर नमस्कार केला; बघतो तर काय, कोणी
तरी अत्तराची भली मोठी बाटली तिकडे ओतल्या सारखा सुगंध त्या जागेतून येत होता.
दादा म्हणाले, “श्रीमहाराजांनी मला दिलेला
सुगंधच निवडला हे माझं भाग्य.” आम्ही सर्व अवाक् होतो, सर्वांनी त्या जागेवर दंडवत
घातला.
धन्यवाद दादा, आपल्यामुळे आम्हा सर्वांना ह्या अलौकिक आनंदाची प्रचिती मिळाली. श्रीनितीनदादा
आणि श्रीमहाराज एकच आहेत याची आम्हाला सांसारातही पदोपदी अनुभूती येतेय. दादा
आम्हा सर्वांना म्हणाले, “श्रीमहाराज म्हणतात, '।। जेथें नाम
तेथें मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही । ।' त्यामुळे तुम्ही सगळीजणं सतत
नामात राहा जेणेकरून श्रीमहाराज तुमच्याकडे आनंदाने खेचून येतील
हा विश्वास बाळगा.”
श्रीकृष्णाने जसे पांडवाच्या बाजूने राहून महाभारतात
पांडवाना युद्ध जिंकून दिलं त्याचप्रमाणे श्रीमहाराज एकदा का अखंडपणे तुमच्या
बाजूने आहेत हे जाणवत राहिलं की हे जीवनरुपी युद्ध तुम्ही जिंकलेंच म्हणून समजा. म्हणूनच सतत नामात राहा ---- इती -- श्रीनितीनदादा.
।।जय श्रीराम ।।
।।सद्गुरुनाथ महाराज की जय ।।
03-06-2020 10:10 pm / POSTED BY : Pramod Shetgaonkar / Where the Experience took place : नुवें, गोवा