जय श्रीराम
एक आजारी गृहस्थ अशी शंका दादांना विचारीत होते कि माझा आजार पुष्कळ बरा आहे पण डॉक्टर शक्तीसाठी शरीराला प्रोटीनची गरज आहे असे सांगतात, तर मी नॉनव्हेज खाऊन ती गरज भागवावी का?
त्यावर दादा म्हणाले, “आपल्या आहारा विषयक कल्पना आपण तपासून पाहिल्या पाहिजेत. शरीराला गरज असेल तर नॉनव्हेज सुद्धा खाण्यास हरकत नसावी, पण एक तर ते डॉक्टरना विचारून घ्यावे. शिवाय शाकाहारी आहारातही प्रोटीन्स असतात तीही घेता येतील.
पण साधनेच्या दृष्टीने म्हणाल तर सात्विक आहाराची तीन लक्षणे स्वतः महाराजांनी सांगितली आहेत.
पहिले म्हणजे भूक लागल्याशिवाय खाऊ नये. उगाचच नेहमीची वेळ झाली म्हणून खाल्ले असे नसावे.
दुसरे म्हणजे शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढेच खावे. उगाच मला इतके लागतेच असं म्हणून जास्त खाऊ नये आणि
सर्वात महत्वाचे आणि अवघड म्हणजे चवीला बळी पडून खाऊ नये. म्हणजेच त्या चवीच्या ओढीने आसक्तीने अन्न खाऊ नये.
इतके आपण पाळले तर आपण खाऊ ते अन्न सात्विकच होईल आणि ते आपल्या शरीराचे चांगले पोषण करेल. त्याचबरोबर सात्विक आहार परमार्थालाही उपयोगी येईल. आपल्याला भगवंताने दिलेल्या ५ संवेदनांपैकी एक म्हणजे चव आणि सात्विक आहारामुळे तीवर आपला थोडा तरी ताबा येईल.”
खरोखर दादांनी सांगितलेली ही सात्विक आहाराची लक्षणे किती सोपी आहेत. पण आपण ती कितपत पाळतो? उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाणे हे या सात्विक आहारात बसते काय? चवीच्या ओढी शिवय आम्ही अन्नसेवन करतो का? काही मोठे संत सर्व पदार्थ एकत्र कालवून त्यात पाणी घालून मग ते अन्न सेवित असत, कि ज्यामुळे त्यांना चवीचं महत्वच उरत नसे व मग त्यांच्या सर्व चवीवरच्या वासना आपोआपच नष्ट होत. आपण इतकं जरी करू शकलो नाही तरी केवळ चवीसाठी वेळी-अवेळी चमचमीत पदार्थ वाटेल तेवढे खाणे, हे तरी नक्कीच टाळू शकू. लग्नसमारंभाच्या पंगतीत ताटभर वाढलेले पदार्थ संपवून पुन्हा आणखी घेण्याची खरोखरच गरज आहे कां? याचा विचार करू आणि दुसऱ्याला 'आणखी घ्या' असा आग्रह करतानाही तो पदार्थ आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्याने तो कितीही चांगला असला तरी सात्विक आहार म्हणून राहणार नाही, याचे भान ठेवून आमच्या आग्रहाला बांध घालू.
जय श्रीराम
03-06-2020 06:33 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : श्रीकांतदादा पुणे / ०३ /०६/२०२०