जय श्रीराम
०२/०६/२०२०
एक हुशार तरुण गृहस्थ एका दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अंथरुणाला बरेच वर्ष खिळून राहिले होते. दादा त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांना अश्वस्त करून रामनाम देऊन आले. त्या गृहस्थांनी रामनाम घेतले. दोन वर्षात त्यांची प्रकृती पुष्कळ सुधारली. आधीचीच औषधे आता लागू पडली. त्यांच्या विनंतीवरून दादा पुन्हा त्यांना भेटायला गेले.
त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना पाठविलेल्या शोधनिबंधाबद्दल ते शास्त्रज्ञ ह्यांना क्रेडिट न देताच त्यांचे निष्कर्ष वापरतात अशी तक्रार ते ग्रहस्थ करीत होते. त्यावर दादा म्हणाले, “तुमची तक्रार खरी आहे. जग असेच आहे. पण आपण असा विचार करावा कि महाराजांनी आजपर्यंत आपल्याला काय काय दिले आहे. हे शोधनिबंध लिहिण्यासाठी जी बुद्धी लागते ती काही आपल्या प्रयत्नांनी आलेली नाही. ती त्यांनी आपल्याला दिली आहे. त्याबद्दल आपण त्यांना कधी क्रेडिट दिले आहे कां? आज दोन वर्षात त्यांनी आपली प्रकृती पुष्कळ सुधारून दिली. आज तुमच्यात इतका फरक झाला आहे कि आम्ही तुम्हाला एखादे वेळेस ओळखू सुद्धा शकलो नसतो. आता ह्या त्यांनी घडविलेल्या सुधारणेबद्दल आपण त्यांना क्रेडिट दिले आहे कां? अशा अनंत गोष्टी आहेत त्याबद्दल आपण त्यांना क्रेडिट देत नाही. आपल्या दोन-चार शोध निबंधासाठी त्या शास्त्रज्ञांनी आपल्याला क्रेडिट दिले नाही अशी तक्रार करणे कितपत योग्य आहे?”
दादांचे हे बोलणे माझ्या मनात खोल रुतून बसले आहे. खरोखर महाराजांनी मला मनुष्य जन्माला घातले. इथपासून ते आज परमार्थाच्या मार्गात मी जी वाटचाल करीत आहे इथपर्यंत इतक्या गोष्टी महाराजांनी मला दिल्या आहेत, याचे भानच मला नाही. त्या गोष्टी मी गृहीत धरून चालतो आणि न मिळालेल्या गोष्टी आठवून तक्रार करीत राहतो. हे काही योग्य नाही. महाराजांनी दिलेल्या एकेका गोष्टीबद्दल पांच पांच मिनिटे नाम घ्यायचे ठरविले तरी त्यात वर्षानुवर्षे जातील. तेंव्हा त्यांना आवडते म्हणून नाम घेत राहण्यातच शहाणपण आहे. तेवढे आपण करायचा प्रयत्न मनापासून करू या.
जय श्रीराम
02-06-2020 11:06 pm / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : श्रीकांतदादा पुणे