जय श्रीराम
२५/०५/२०२०
विचार पादुका चिंतन पुष्प - १ महाराजांशी नातं: एकदा काहीशा उद्धटपणे दादांना विचारलं, "दादा, तुमचं आणि महाराजांचं नातं काय?" दादा शांतपणी म्हणाले, "तसं आपलं प्रत्येकाचच महाराजांशी नातं आहे. आपल्या सर्वांच्याच हृदयात ते वास करतात. ते अंतर्यामी आहेत. पण म्हणलं तर ते नातं कसं सांगता येईल? एखाद्या छोट्या लाटेचं सागराशी काय नातं असतं? एखाद्या मोठ्या त्सुनामीचं काय नातं असतं? म्हटलं तर त्या दोन्ही सागराशी एकरूप आहेत. म्हटलं तर वेगळ्या आहेत. तुम्ही पाण्यातून पहाल तर तुम्हाला त्या एकरूप असल्याचे दिसेल. बाहेरून पहाल तर समुद्र वेगळा दिसेल, त्सुनामी वेगळी दिसेल, छोटी लाट वेगळी दिसेल. तुम्ही कोठे आहात? कोठून पहात आहात यावर तुम्हाला काय दिसेल कसं दिसेल ते अवलंबून आहे. आणि समुद्राला विचाराल तर तो काय म्हणेल? तो म्हणेल, ती इवलीशी लाट पण मीच आहे, ती त्सुनामी पण मीच. मी सगळीकडे व्यापून राहिलेलो आहे." एवढे बोलून दादा थांबले आणि आपण कुठे आहोत, कुठून पहात आहोत? पाण्यातून की बाहेरून असा विचार करत आम्ही मात्र त्या विचारात बूडून गेलो.
जय श्रीराम
25-05-2020 06:11 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : पुणे