जय श्रीराम
२७ सप्टेंबरच्या प्रवचनामध्ये महाराज म्हणाले
की 'मी देही
नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा
मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे,
म्हणजे देहाचा विसर पडतो.
पपा तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची एक ओळ नेहमी सांगतात, "मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे
कारण ||” मला हे अतिशय भावतं कारण
मनाच्या कोणत्याही स्थितीत ही वाक्ये आठवल्याने माझ्या मनाला धैर्य येतं आणि परमार्थ करण्याचा
निश्चय पुन्हा बळकट होतो.
पण दुसरीकडे आम्ही आरतीमध्ये गातो -
"नाम नाही
मुखी हेचि एक पाप । तेथे अनुताप कैचा होय ?"
नंतर बोलताना पपांनी मला एकनाथ महाराजांचाही एक अभंग दाखवला ज्यामध्ये एकनाथ महाराज म्हणतात
-
“कोरड्या त्या ज्ञानगोष्टी । अनुताप नाही
पोटी ॥
अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥
एकाजनार्दनी अनुतापे पाहे । मग देव आहे
जवळी तया ॥”
हे ऐकून असं स्पष्ट दिसतं की परमार्थ साधण्यासाठी
अनुताप लागतोच ! आता मला प्रश्न पडला कारण माझ्या बुद्धीला आरतीच्या आणि एकनाथ महाराजांच्या
ओळी महाराजांच्या वाक्यांबरोबर जुळत नव्हत्या. एकीकडे मी मानतो की मी भगवंताचा आहे
आणि दुसरीकडे म्हणतो की माझ्यासारखा नाम न घेणारा आणि माझ्यासारखा पापी कोणी नाही
! जर मी भगवंताचा आहे तर अनुतापाची गरज काय? किंवा जर मी भगवंताचा आहे तर अनुतापाशिवाय भगवंत जवळ येत नाही
हे कसं ?
पण पपांनी ही आरती आम्हां सर्वाना दिली
आहे आणि एकनाथ महाराज म्हणतात की अनुतापाशिवाय परमार्थ कधीच साधणार नाही, म्हणजे मग अनुतापाचे काहीतरी विशेष महत्त्व असलेच पाहिजे. ते महत्त्व
काय आहे, असही मी पपांना
विचारल.
पपांनी आधी समजावून सांगितले की संतांची
वचने जुळत नाहीत असं कधीच होणार नाही. ते पुढे म्हणाले, महाराज म्हणतात की भगवंताला विसरणं हेच
सर्वात मोठं पाप आहे. मी भगवंताचा आहे म्हणवतो आणि आपण त्याला विसरतो (तो सतत कुठे ध्यानात असतो?) म्हणून त्याबद्दल अनुताप तर असावाच ! अनुताप, पश्चाताप असा असावा की
जेणेकरून नाम घेण्याचा निश्चय आणखी दृढ व्हायला पाहिजे. ‘माझं आचरण अगदी वाईट आहे, मनामध्ये बरीच घाण भरलेली
आहे.’ - या गोष्टींबद्दल
वाईट वाटल्याने साधकाला नाम घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि
सच्चा अनुताप असेल तर ती मिळते.
पण आपण कुठपर्यंत वाईट वाटून घ्यावं हेही
महत्वाचं आहे. साधक अवगुणाने भरलेला असेल, पण म्हणून उगीच अवगुणांबद्दल नुसतंच रडगाणे गाणं की ‘मी किती वाईट आहे, मी किती पापी आहे’; ह्याने काही फायदा होत
नाही. कारण मी रडतो पण काही काळाने परत भगवंताला विसरतो मग अशा रडगाण्याचा काय फायदा.
दुसरं म्हणजे इतरांसामोर हे रडगाणं गायलो तर लोक म्हणतात की अरे बघा, हा किती प्रामाणिक आहे, स्वतःबद्दलचे दोष ओळखून आहे. पान आपण नुसतं म्हटलं पण त्यावर कृती काही केलीच नाही तर मात्र साधत काहीच नाही, उलट अभिमान मात्र वाढू शकतो ! आणि पुढे पुढे परमार्थ कधी न साधण्यासारखी गोष्ट
वाटू लागण्याचा संभव असतो.
मनुष्यजन्माला आलेल्याला परमार्थ साधू
शकत नाही हे शक्यच नाही ! परमार्थाच्या रस्त्यावर मी कधीतरी अडखळून पडेन पण उठून पुन्हा
प्रयत्नाला लागावं, आणि हे
माझ्या हाती आहे ! वाईट कृत्ये केल्याबद्दल नुसतंच रडण्याऐवजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे
अनुतापाने वाईट वाटलं पाहिजे, मग त्यावर मनन करावं की यापुढे माझ्यात सुधारणा कशी होईल, आणि मग साधनेला (नाम घ्यायला) लागावं ! मग हळूहळू का होईना, पण मनात भक्कमपणे (permenant) बदल केव्हातरी होईलच कारण साधनात महाराज स्वतः बरोबर असतात!
परमार्थामध्ये अनुतापाची गरज आहेच आहे, आणि याचा नीट वापर होऊन
माझा परमार्थ चांगला वाढावा ही तुमच्या चरणी प्रार्थना, पपा
!
जय श्रीराम
02-11-2020 05:52 am / POSTED BY : Vikram Samant / Where the Experience took place : अमेरिका