जय श्रीराम
नमस्कार.
२००३ साली मी पुण्यात नोकरी करत असताना एक दिवस अचानक मला प्रोजेक्ट साठी एक-दीड महिना मुंबईला जावे लागले. तेव्हा माझे नवीनच लग्न झाले होते व पल्लवीला (बायको) पुण्यात एकटीलाच राहावे लागणार होते. तरी सुद्धा मी काही तक्रार न करता मुंबईला गेलो. या गोष्टीचे पुढे मला देखील आश्चर्य वाटले पण ती नितीनदादाची दीव्य योजना होती हे नंतर कळले. तो पर्यंत मला दादाचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण २००२ सालच्या शेवटी गोंदवले मंदिरात श्रीमहाराजांचा अनुग्रह मिळाला होता.
मुंबईला क्लायंट ऑफिसला गेल्यावर प्रोजेक्ट मॅनेजरची पहिल्यांदाच भेट झाली. प्रोजेक्टचे काम सुरू झाले. काही दिवसात माझी व मॅनेजरची थोडी ओळख वाढली व कामाव्यतिरिक्त इतर विषयांवर सुद्धा बोलणे होऊ लागले. तो बरीच वर्षे अमेरिकेत राहून नुकताच भारतात आला असल्याचे कळले. एकदा देवाविषयी बोलणे झाले तेव्हा मॅनेजरचा देवावर विश्वास आहे हे ऐकून मला सुखद धक्का बसला. कारण मला त्याच्याकडे बघून असे काही असेल असे वाटलेच नव्हते. मी त्याला कोणत्या देवाची उपासना करतोस असे विचारल्यावर त्याने 'श्रीराम' असे सांगितले तेव्हा मला अजूनच आश्चर्य वाटले. मी त्याला म्हंटले मी सुद्धा श्रीरामांचीच उपासना करतो आणि श्री गोंदवलेकर महाराजांची शिकवण फॉलो करतो. हे ऐकून त्याला सुद्धा खूप आश्चर्य वाटले आणि त्याने मला सांगितले की त्याचा मोठा मावस भाऊच त्याचा गुरु आहे, तो सुद्धा गोंदवलेकर महाराजांचीच शिकवण सांगतो. तो अमेरिकेत असतो आणि त्याला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले आहे. तो मावसभाऊ दुसरा तिसरा कोणीही नसून माझा नितीनदादाच होता हे नंतर समजले. तेव्हा मी पहिल्यांदा दादाविषयी ऐकले व मनात दादाच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली. आपल्या आयुष्यात महाराजांसारखेच पूर्णत्वाला पोहचलेले कोणीतरी असावे असे मला सारखे वाटायचे.
मी मुंबईत नातेवाईकांकडे उतरलो होतो. ऑफिस मधून संध्याकाळी घरी गेल्यावर चहापाणी करायचे व नंतर महाराजांचा एक छोटा फोटो समोर ठेवून जप करत बसायचे असा नित्यक्रम होता. एका संध्याकाळी जप करताना मनात विचार आला, "महाराज, तुम्ही सुद्धा हाच मंत्रजप करायचा ना तर मग तुमचा आवाज कसा होता?" मनात असंख्य विचार येतात तसा हा विचार आला पण तो लक्षात राहिला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर मॅनेजर मला म्हणाला की मी तुझ्यासाठी काही आणले आहे. मला प्रश्न पडला की नवीन ओळख असताना याने असे काय आणले असावे? त्याने खिशातून एक डिजिटल डायरी काढली व त्यावर एक ऑडिओ फाईल होती ती मला ऐकवली. त्यामध्ये कोणीतरी 'श्रीराम जयराम जयजयराम' असे म्हंटले होते. ते काय आहे असे मी विचारले असता मॅनेजर म्हणाला काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत असताना त्याने ती डिजिटल डायरी विकत घेतली व त्यात असलेली ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा दादाला दाखवली तेव्हा दादानी त्याच्या स्वतःच्या आवाजात तो मंत्र रेकॉर्ड केला होता. मला तेव्हा काही लक्षात आले नाही पण काही वेळानी डोक्यात उजेड पडला, "अरे, काल काय विचारले होतेस महाराजांना?" महाराजांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दादानी माझ्यासाठी काही महिने आधीच तयार करून ठेवले होते व प्रश्न विचारल्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या पर्यंत पोहचवले सुद्धा होते. या एकाच अनुभवातून दादानी मला त्याचा आवाज ऐकवला व तो आणि महाराज वेगळे नाहीत हे ही सांगितले. मग मात्र दादाच्या दर्शनाची ओढ अजूनच दृढ झाली. पुढे काही काळाने ती ऑडिओ फाईल आपोआप नाहीशी झाल्याचे मला मॅनेजर कडून कळाले. यावरून मला दादाच्या छत्रछायेखाली बोलावण्यासाठीच त्याने ती ऑडिओ फाईल तयार केल्याचे स्पष्ट झाले.
हा अनुभव मला देऊन दादानी श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील "माझीये मनीचा जाणोनिया भाव । तो करी उपाव गुरुराजा ।। आवडीचा मंत्र सांगितला सोपा । तेणे नव्हे गुंफा काही कोठे ।।" या ओळी माझ्या बाबतीत अक्षरशः खऱ्या केल्या.
दादानी मला आतापर्यंत दिलेल्या अनेक अनुभवांपैकी हृदयाच्या अतिशय जवळ असणाऱ्या काही अनुभवांपैकी हा एक आहे. एकदा हा अनुभव दादासमोर मी इतरांना सांगितला असताना त्यावर दादा म्हणाला यामध्ये महाराजांनी नामाने गाठ बांधली हे त्याला भावते. ही गाठ कधीही न ढिली व्हावी किंवा सुटावी, जन्मोजन्मी दादानी त्याच्या पायाशी जागा द्यावी हीच आजच्या मंगल दिवशी त्याच्या चरणी प्रार्थना.
नमस्कार
जय श्रीराम.
31-10-2020 02:01 am / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : मुंबई