।। जय श्रीराम ।।
बरेच वर्ष आजारपण काढलेले आणि आता नामामुळे हळूहळू त्या आजारातून बाहेर पडायला लागलेले एक तरुण बुद्धिमान ग्रहस्थ दादांना म्हणाले, "तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं बसवेल तसा जप मी करतो खरं, पण मनात असं येतं की महाराज म्हणतात तसा तेरा कोटी कधी पुरा होणार? एवढं आयुष्य तरी मला लाभेल कि नाही माहीत नाही. त्यापेक्षा योग मार्गाने समाधीचा मार्ग आपल्याला लवकर भगवत् दर्शन करून देईल तर तो कां अनुसरू नये?"
दादा त्यांना म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी तुम्ही पूर्णपणे निराश, गलितगात्र असे होतात. तेंव्हा तुम्ही सुरु केलेल्या रामनामाचा परिणाम तुम्ही पाहता आहात. आश्चर्य वाटावं अशी सुधारणा तुमच्या प्रकृतीत घडली आहे असं तुम्हीच सांगताय. तरी पुन्हा असा विकल्प मनात का येतोय? तुम्ही नाम घेत रहा. महाराज बाकी सगळं पाहतील. तुम्ही त्याचा विचारच करू नका?”
एवढं सांगितल्यावरही ते गृहस्थ पुन्हा योग मार्गाने लवकर साधेल या आपल्या विचाराचं समर्थन करीत राहिले. शेवटी दादांना तो विषय बहुधा संपवायचा असावा. ते म्हणाले, "तुम्ही म्हणता तसा तो योगाचा मार्ग चांगला असेलही, त्याने लवकर साधेलही कदाचित् पण तो अवघड आणि काहीसा धोक्याचा आहे. चांगल्या गुरूच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे आम्ही कामकरी मंडळी (तिथे जमलेले आम्ही चौघे (दादा धरून) प्रोफेशननी इंजिनियर होतो) महाराजांनी सांगितलेलं सोप्यातलं सोपं नाम घेतो. आम्हाला तो अवघड योग काही जमत नाही.”
दादांनी असं म्हटल्यावर काहीसं शरमिंद होत त्यानीही तो विषय थांबवला. खरंतर गुरुदेव रानड्यांसारख्या चाळीस वर्षात एकही दिवस प्रकृती ठीक नसलेल्या व्यक्तीने नामाचाच मार्ग अनुसरून केवढी प्रगती साधली, हे त्यांनाही माहीत होते. गुरुदेवांनी पू. बाबा बेलसरे यांनाही तुम्ही नामात रहा. नामात तुम्हाला योगाचे सर्व अनुभव येतील हे सांगितलं होतं, आणि त्याचंच अनुकरण करून पू. बाबा बेलसरे यांनी केवढं उच्च स्थान परमार्थात प्राप्त केलं हेही सर्वांना माहीत आहे. तरीही असे विकल्प बुद्धिमान लोकांच्या मनात येतात हे खरेच.
महाराजांनीच असे विकल्प आपल्या मनात न येऊ देण्याची कृपा करावी हीच प्रार्थना.
।। जय श्रीराम ।।
29-10-2020 10:57 pm / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : पुणे