।।जय श्रीराम ।।
महाराजांची कृपा आपल्या वाट्याला ज्या दैवी अनुभवातून येते त्याचं मोल फार मोठं आहे. इंदिराताईंच्या (दादांच्या पत्नी) वाट्याला असे खूप अनुभव आले आणि दादांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांची त्या त्या वेळी तपशिलासह नोंद ठेवली आहे.
एकदा नात्यातल्या एकीला त्या ती नोंद वाचून दाखवत होत्या. रात्री दहाला सुरू झालेले ते वाचन रात्री दोन वाजले तरी चालूच होतं! त्या बाईला मात्र झोप यायला लागली शेवटी नाईलाजाने इंदिराताईनी थांबवायचं ठरवलं. पण भूतकाळातल्या दैवी अनुभवांच्या नोंदीमुळे त्या अनुभवांच्या काळात त्यांचं मन गेलं होतं. आणि त्यामुळे ते मन इतकं उत्तेजित झालं होतं कि त्याला झोपेची विश्रांतीही नकोशी वाटत होती. त्या दिव्य अनुभवांची गोडी पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटत होती.
हा अनुभव इंदिराताईंनी सांगितल्यावर दादा म्हणाले, “आपणही आपल्याला आलेल्या अनुभवांची अशी नोंद अवश्य करून ठेवावी. भविष्यात ज्यावेळी काही कारणांनी आपलं मन उदास असेल किंवा साधनात कंटाळा आला असेल किंवा मन लागत नसेल त्यावेळी हे अनुभव मनाला प्रोत्साहन देतील. मन पुन्हा उत्साहित होईल व साधनेला गती मिळेल.
त्या अनुभवात महाराजांची कृपा असल्याने ते अनुभव साधकासाठी अत्यंत उपयोगी असतील. ते अनुभवांचे वाचन साधकाला त्या अनुभवाच्या काळात घेऊन जाईल. साधकाला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. महाराजांचा सहवास लाभल्यासारखा परिणाम होईल आणि साधक पुन्हा नव्या प्रेरणेने साधनाला लागेल. हे अनुभव ज्याचे त्याला जास्त उपयोगी असल्याने आपणच आपल्याला आलेल्या अनुभवांचे लेखन करणे जास्त चांगले.”
दादांच्या सहवासात आपल्या वाट्याला असे अनुभव लहान मोठ्या स्वरूपात निश्चितपणे येतात. त्या त्या वेळी मनाने त्याचे तपशील वेचून ते स्मृतीत जपून त्याची नोंद करून ठेवणे सहज शक्य आहे.
महाराजांच्या अनुसंधनासाठी उपयोगी असे हे सोपे साधन दादांनी आवर्जून आपल्याला सांगितले आहे. ‘महाराजांच्या अनुसंधनासाठी अशा सोप्या सोप्या युक्त्या महाराजच आपल्याला देत असतात.’ असं दादा सांगतात.
आपण त्या युक्त्या कृतीत आणून त्याचा जरूर तेंव्हा उपयोग करणे आपल्याच हिताचे आहे.
।।जय श्रीराम ।।
26-10-2020 10:10 am / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : पुणे