जय श्रीराम
नमस्कार.
१०-ऑक्टोबरच्या प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात, "विघ्न रामसेवेंत भारी। तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरीं II".
या वाक्यावर निरूपण करताना नितीनदादा म्हणाला, "रामसेवा करणे किंवा भगवंत/सद्गुरूंची सेवा करणे ही सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. म्हणून ती सेवा करण्यात अडथळेही त्याच तोडीचे येतात. तरी साधकाने त्या अडथळयांचा अतिशय धैर्याने सामना करून आपली साधना सांभाळली पाहिजे. जसे आपण म्हणतो की लढाईमध्ये तळहातावर शीर घेऊन लढायचे असते म्हणजे शीर कधीही उडवले जाईल याची तयारी ठेवून अतिशय धैर्याने लढायचे असते तसेच (किंबहुना त्यापेक्षाही जास्त) धैर्य परमार्थात लागते. मार्गातील अडथळ्यांनी साधनेवरील लक्ष विचलीत न होऊ देता किंवा त्यांना घाबरून न जाता साधन दृढपणे करत राहावे. सेवा करताना अडथळे हे येणारच. त्यांची सेवा करणे म्हणजेच आपले साधन करत रहाणे हे होय. एका दृष्टीने पहाता आपण त्यांची सेवा करूच शकत नाही. ते आपल्याला समजणाऱ्या व न समजणाऱ्या अशा सर्व बाबतीत अनंत आहेत. म्हणून एका दृष्टीने त्यांची सेवा करता येणे अशक्य आहे. मग त्यांची सेवा करण्याचा एकच मार्ग म्हणजे त्यांना आवडते ते करणे. म्हणून त्यांचे अखंड स्मरण करणे ही त्यांची सर्वोच्च सेवा होय. श्रीमहाराज आज आपल्याला सावधान करत आहेत की आपल्याला त्यांची सेवा करण्यात एक-दोन नव्हे तर अनेक अडचणी येतील आणि त्याही आपल्या आवाक्या बाहेरच्या. त्यामुळे आपण असे समजू नये की हा मार्ग चालणे सोपे आहे. आपण असे म्हणतो की ते माझ्या सतत बरोबर आहेत. असे असताना आपल्या आयुष्यात अडचणी नाहीत का? ते सोबत असताना अडचणी कशा काय जाणवतात? म्हणून ते आज आपल्याला सांगत आहेत की जरी अडचणी जाणवत असल्या तरी साधकाची जवाबदारी आहे की विचलीत न होता अतिशय धैर्याने साधन करत रहावे मग आपल्याला ते सोबत असल्याची जाणीव होईल. त्यांना हे बघायचे आहे की कितीही अडथळे आले तरीही आपण धैर्याने साधन करतो का? या उलट अडथळे आल्यावर आपण त्यांना शरण जाऊन अडथळे दुर करण्याची प्रार्थना करतो. हे त्यांना अपेक्षित वागणे नव्हे. आपण त्यांच्या मदतीची अपेक्षा न करता आपल्या साधनेत धैर्य, अविचलितपणा दाखवला पाहिजे. कारण त्यांचे अस्तित्व आपल्या साधनेत आहे. मग त्यांना साधना सोडून ईतर कुठे शोधावे?
प्रवचनातले हे वाक्य त्यांच्या काही थोर वाक्यांपैकी आहे ज्यात त्यांनी शिष्याची जवाबदारी वेगळ्या प्रकारे सांगितली आहे. याउलट आपण असे शिष्य आहोत की कुठलीही छोटी-मोठी गोष्ट झाली की त्यांचा धावा करतो. आपण कोणती गोष्ट त्यांच्या कानावर जेव्हा घालतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तिथे आपली सुप्त इच्छा असते की त्यांनी आपल्याला त्यातून सोडवावे किंवा आपल्याला ते सहन करण्याची शक्ती द्यावी. आपली त्यांच्यावर ईतकी सुद्धा श्रद्धा नाहीये का की ते आपल्या बाबतीत जे आवश्यक आहे ते करतील? आपल्या बाबतीत काय घडते आहे याची त्यांना आठवण करून द्यायची जरूर आहे का? तसे असेल तर आपण त्यांना सर्वज्ञानी म्हणण्यात काय अर्थ आहे? जर त्यांना सगळ्या गोष्टींचे ज्ञान आहे तर मग मी त्यांना माझ्या आयुष्यात काय चालले आहे हे का सांगावे? आपली श्रद्धा वाढत जाऊन एक दिवस असा येईल की आपण त्यांना काही सांगणार नाही कारण आपण साधनेत बुडालेले असू. आपल्या जवळ आपल्या सोबत होत असलेल्या निरर्थक (परमार्थ दृष्टीने) गोष्टी सांगण्याचा वेळच नसेल. जे घडणे योग्य असेल, जे माझ्या नशीबात असेल तेच होईल असा विचार करून आपण त्यांना काही सांगण्यात वेळ दवडणार नाही. अशा व्यक्तींना सांगावे लागते ज्यांना काही माहीत नसते पण ते तर सर्वज्ञ आहेत, त्यांना सगळे माहीत आहे. तेच तर माझे नशीब लिहितात."
दादाचे बोलणे ऐकून मला संत कबीरांचा "प्रेम न बाडी उपजै, प्रेम न हाट बिकाय I राजा परजा जेही रुचै, सीस देइ ले जाय II" (भगवंताचे प्रेम शेतात पिकत नाही किंवा बाजारात विकत मिळत नाही. ज्याला कोणाला ते हवे असेल त्याने स्वतःचे शीर देऊन ते घेऊन जावे) हा दोहा आठवला. असे वाटले की दादा माझा सद्गुरू म्हणून माझे पारमार्थिक भले करण्याची त्याची जवाबदारी जन्मोजन्मी अगदी अचूक पणे पार पाडतो आहे कारण भगवंत कधी चुकुच शकत नाही. आज त्याच्या कृपेने मला माझी जवाबदारी कळली आहे. दादा म्हणतो तसे धैर्याने व निरपेक्ष बुद्धीने साधन करण्याच्या प्रयत्नाला लागलेच पाहिजे म्हणजे पुढे कधीतरी त्याच्याच कृपेने ते जमेल.
नमस्कार
जय श्रीराम.
22-10-2020 10:38 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : व्हर्चुअल सत्संग, अमेरिका.