जय श्रीराम
१२ तारखेस मला एक मेसेज आला, त्यात सांगितले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.०० पर्यंत अत्यंत शुभमुहूर्त आहे. पाचशे वर्षांपूर्वी असा योग आला होता आणि पुढील चारशे वर्षे असा योग नाही. यावेळी नवग्रहांपैकी सहा ग्रह अतिशय उत्तम स्थानात आहेत. प्रभु रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी अशी ग्रहस्थिती होती. रावणाने इंद्रजिताच्या जन्मवेळी अशी ग्रहस्थिती मागून घेतली होती. यावेळी भगवंताचा नामजप केला तर आपल्या सर्व कामना पूर्ण होतील. मी रात्री हा मेसेज माझ्या नात्यातील एका व्यक्तीला forward केला व काही मित्रांना पाठवला.
आम्ही रविवारी ठरवून साधन करतो. सकाळी १० वाजता मनात आले की मी जेव्हा हाा मेसेज माझ्या नातलगाला पाठवला तेव्हा त्या व्यक्तिच्या बहिणीला पाठवला नाही. म्हणून तिला तो मेसेज पाठवला आणि त्यावर लगेच reply आला . तिने कळवले की या शुभमुहूर्तावर, तिच्या ग्रुपने सत्संग आयोजित केला होता.
नंतर मी अल्पनाला (पत्नी) सांगितले की मी मेसेज त्या व्यक्तींना केला तो या हेतूने की त्यांचे नामस्मरण व्हावे. पण त्या व्यक्तीस तो आधीच माहित होता. आपल्याला वेगळे काही साधन करायची गरज नाही कारण आपल्या नेहमीच्या साधनाची पण तीच वेळ आहे असे मी पुढे तिला सांगितले.
अल्पनाला मग तिला तो मेसेज तिच्या काही नातलगांना पाठवावासा वाटला. वेळेअभावी तिने मला मेसेज पाठवायला सांगितला. मी तसे केले तेव्हा मला लगेचच समोरून reply आला. Thank you, but I have received this message on my four groups already.
त्यानंतर आम्ही साधनेला सुरवात केली. मी स्वतःशीच ठरवले की आज साधन मन लावून करायचे आणि मध्ये ब्रेक घ्यायचा नाही. मग दादाने आधी सांगितलेली गोष्ट आठवली की अश्याच एका पर्वकाळी महाराजांनी त्यांच्या काही भक्तांच्या साधनेच्या आड येणारे राग, द्वेष आदी विकार काढून घेतले. महाराज नंतर भाऊसाहेबांना म्हणाले मी त्या दिवशी कोणी देहबुद्धी सोडवायला सांगितले असती तरी मी तसे केले असते. मी कस्तुरी घेऊन बसलो होतो पण सगळे हिंग मिरीचे गिऱ्हाईक होते.
मी नामात पूर्ण लक्ष द्यायचे आणि मागायचेच झाले तर दादांकडून देहबुद्धी कमी/ नष्ट होवो असे मागायचे ठरवले. दादांच्या कृपेने त्यादिवशी नामस्मरण श्रध्देने झाले.
नंतर काही गोष्टी मनास जाणवल्या त्या अश्या
१) जरी आमचे नामसाधन ठरलेले होते तरी दादांच्या कृपेने मला तो मेसेज मिळाला आणि त्यामुळे साधनात उत्कटता वाढली.
२) हा शुभकाळ पितृपक्षात आला होता. असे म्हणतात की पितृपक्षात कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार होत नाही, काही कार्य ठरवत नाहीत. पण साधकाला नाम घेण्यासाठी मात्र सर्व काळ शुभ असतात या दादांच्या शिकवणीचा येथे प्रत्यय आला.
३) आपला अहंकार किती खोल गेला आहे हे जाणवले. मेसेज पाठवताना 'मी' तो पाठवला. 'मी' कोणाचे तरी भले करतो हा अहंकार होता. त्यामुळे 'मी' कोणालातरी पाठवण्याचे राहून गेले हे अहंकाराचेच दुसरे रूप नंतर पुढे व्यक्त झाले. सर्व काही देव किंवा सद्गुरू करतात ही जाणीव नव्हती. दादांनी दाखवून दिले की तू कोण कळवणारा? मी आधीच त्या व्यक्तींना दुसरीकडून मेसेज पाठवले की नाहीत?
ही सगळी नसती उठाठेव करण्यापेक्षा कर्तेपण दादांना देऊन मी मनातील विचारांची गुंतागुंत सहज टाळू शकलो असतो.
४) माझ्या मनाची उडी कितीही म्हटली तरी मी (देहबुद्धी) व माझे यापलिकडे जात नाही हे स्पष्ट जाणवले. माझा मुलगा, मााझी माणसे ही रक्ताची नाती मानतो पण आपले जे ईश्र्वराशी असलेले अनंतकाळाचे आणि कायमस्वरूपी नाते विसरतो.
ही माझी माझी म्हटलेली माणसे मला किती आपले मानतात याची खात्री नसतानाही आपण त्यात अडकून पडतो आणि जो माझ्याशी कधीही प्रतारणा करत नाही त्या परमेश्वराला मात्र विसरतो आणि तीच चूक परत परत करत राहतो.
५) मी आणि माझे यांचा आकुंचित विचार सोडल्याशिवाय परमार्थात प्रगती नाही. वाल्याचा वाल्मिकी होण्याच्या प्रवासातील ती श्री नारद (सद्गुरू) भेटीनंतरची पाहिली पायरी आहे. माझे कोण या विचारापेक्षा मी कोण? आणि मी कोणाचा आहे ह्याचे सखोल चिंतन मनन जर माझ्याकडून झाले आणि त्याला साधनाची जोड असली तर माझे परमेश्वराशी असलेले नाते हळूहळू उलगडू लागेल आणि सतत अनुसंधान ठेवण्याच्या आपल्या खारीच्या प्रयत्नांना आपले सदगुरू गरुडाचे बळ देतील आणि मग सगळेच माझे होतील.
सद्गुरूनाथ महाराज की जय
जय श्रीराम
29-09-2020 12:27 am / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : १३ सप्टेंबर , २०२० रविवार नुवे, गोवा