श्रीराम समर्थ 🙏🏻
*पूज्य दादांच्या सहवासातील श्रीमहाराजांची प्रत्यक्ष अनुभूती*
ह्या दिव्य प्रचितीला तीन
वर्षे
झाली आहेत. दिवस २१ सप्टेंबर
२०१७, माझे अहोभाग्य की श्रीकृपेने पूज्य नितीनदादांकडे
प्रसादाला जाण्याचा योग आला. साहजिकच खूप आनंदाने आणि उत्साहाने मी वेळेच्या आधीच
११:३०च्या सुमारास पोहोचलो. प्रसादापूर्वीच श्रीमहाराजांनी दादांवर केलेल्या कृपेच्या अनेक गोष्टी ऐकण्याचा
प्रसादही मिळाला. नंतर प्रसाद झाल्यावर पूज्य दादा त्यांच्या नेहमीच्या कोचावर
बसले होते. त्यावेळी बॅकग्राऊंडला संत तुकाराम महाराजांचा अभंग सुरू होता,
हाचि नेम आता न फिरे माघारी।। बैसले शेजारी गोविंदाचे ।।
पूज्य दादा डोळे मिटून तल्लीन होऊन अभंगात समरस झाले होते. मी, सौ.वहिनी (दादांच्या पत्नी), कल्पिता ताई...समोर बसलो होतो. वहिनी दादांसोबतचे
श्रीमहाराजांचे अनुभव सांगत होत्या. अभंग संपत आला होता आणि बैसले शेजारी
गोविंदाचे ह्या भक्ति भावातील भजनाचे ध्रुवपद सुरू होते. एक दिव्य सुगंध दरवळत
होता. पूज्य दादांचे डोळे अजूनही बंद होते व ते कोणत्यातरी वेगळ्याच विश्वात
रमलेले दिसत होते. आमच्या गोष्टी अजून चालू असतानाच पूज्य दादा अचानक उठले आणि
त्यांनी शेजारच्या जागेवर कुणी बसले होते, त्यांना साष्टांग नमस्कार घातला; डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या. थोड्या वेळाने ते
म्हणाले, “महाराज आले आहेत नमस्कार करा.”
मला महाराज दिसले नाहीत; पण पावलांच्या जागी डोके
ठेवल्यावर रोमांचित व्हायला झाले कारण एका वेगळ्याच सुगंधाचा अनुभव आला.
सौ.वहिनींनीही नमस्कार केला. कल्पिता ताई, कोरगावकर मंडळीनी पण नमस्कार केला...
काही वेळ निःशब्द नीरव शांतता पसरली होती. तो दिव्य सुगंध दरवळतच होता. काही
वेळाने आम्ही भानावर आलो.
त्या दिवशी संध्याकाळी नाम संकीर्तनाचे वेळी पूज्य दादा नेहमीच्या कोचावर बसले
नव्हते. प्रवचनाचे वाचन व विश्लेषण झाल्यावर पूज्य दादांनी त्या नेहमीच्या कोचावर
न बसण्याचे कारण सांगितले.
पुज्य दादा व श्री महाराज नेहमीच सोबत असतात. त्यांच्या मुखातून श्री महाराजच आमच्याशी बोलत असतात अशी माझी धारणा आहे.
अनन्य शरणागती, असीम नाम निष्ठा, दृढ श्रद्धा, अपार संयम व अखंड नामस्मरण या मुळे पूज्य दादा श्रीमहाराजांशी एकरूपच झाले
आहेत.
श्री महाराज म्हणायचे ना -
“नाम
घेताना मनाने मला धरुन ठेवा. माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल. मग तुम्ही माझ्या
सारखे व्हाल.”
पूज्य दादांच्या अमानित्वाच्या आचरणामुळे आम्हाला त्यांच्या खऱ्या अवस्थेची
कल्पना नाही.
आपले परमभाग्य की पूज्य दादांच्या रुपात श्रीमहाराजच आपल्याला मार्गदर्शन करीत
आहेत. हे मार्गदर्शन व कृपा अशीच आम्हा सर्वांवर बरसत राहो हीच श्रीमहाराजांच्या
चरणी प्रार्थना !!
जया दर्शनें स्वस्थता ये जिवाला
मृदू बोलही शांतवीती मनाला
म्हणे सर्व कर्मात नामास साधा
नमस्कार त्या पूज्य नितीनदादा
जय श्रीराम 🙏🏻
28-09-2020 04:28 am / POSTED BY : Swanand Mulay / Where the Experience took place : गझदर आश्रम, मुंबई.