जय श्रीराम
नमस्कार.
"संतपायी माया धरिता सद्भावे" या अभंगात संतांचा महिमा सांगताना श्री. नामदेव महाराज म्हणतात, "साधुपाशी देव कामधंदा करी । पितांबर धरी वरी छाया ।।". याचा प्रत्यय नितीनदादानी मला या अनुभवातून दिला.
मी एकदा सत्संगासाठी नितीनदादाच्या घरी (अमेरिकेत) गेलो असताना दादानी मला विचारलं की मी एक विशिष्ट वेबसाईट वापरतो का? (ह्या वेबसाईटवर श्रीमहाराजांची प्रवचने वगैरे उपलब्ध आहेत.) मी 'हो' म्हणून उत्तर दिले. त्यावर दादा म्हणाला त्याच्या लॅपटॉपवर ती वेबसाईट चालत नाही. दादाच्या परवानगीने मी त्याचा लॅपटॉप तपासून पाहू लागलो. दादा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळे ब्राउजर वापरून वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला, ब्राऊजरचे सेटिंग रिसेट केले, असे सर्व करून झाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग दादानी मला सांगितले की दादा जेव्हा विक्रमच्या अपार्टमेंटमध्ये जातो तेव्हा ती वेबसाईट त्याच लॅपटॉप वरून व्यवस्तिथ चालते. यावरून मी असा निष्कर्ष काढला की लॅपटॉप मध्ये काही बिघाड झालेला नसून प्रॉब्लेम इंटरनेट कनेक्शनमध्ये आहे. यावर मी दादाला सुचवले की एक तर इंटरनेट राऊटर किंवा मग इंटरनेट कंपनी वेबसाईट ब्लॉक करत असावी. नक्की काय प्रॉब्लेम आहे हे शोधुन काढण्याकरता मी दादाला असेही सुचवले की राउटरच्या सेटिंग मध्ये कुठे ही वेबसाईट ब्लॉक केली आहे का ते पाहावे लागेल आणि राउटर न वापरता इंटरनेट मोडेम लॅपटॉपला डायरेक्ट जोडून पाहावे लागेल.
मी दुसऱ्या दिवशी सत्संगसाठी गेलो तेव्हा दादा म्हणाला त्यानी मी सुचवलेल्या दोन्ही गोष्टी करून पाहिल्या पण वेबसाईट चालली नाही. यावर मी दादाला म्हणालो की याचा अर्थ प्रॉब्लेम इंटरनेट कंपनीचाच आहे व त्यांच्याशी फोनकरून बोलावे लागेल. ईथे विषय संपला.
काही आठवडयांनी मी पुढच्या सत्संगासाठी जेव्हा दादाच्या घरी गेलो तेव्हा पाहिले की दादानी ती वेबसाईट त्याच्या लॅपटॉपवर उघडून आमच्यासाठी प्रवचन वाचले. मी कुतुहलाने दादाला विचारले की त्यानी इंटरनेट कंपनीला फोन केला होता का? प्रॉब्लेम कसा दुरुस्त झाला? त्यावर दादा शांतपणे म्हणाला की त्याने इंटरनेट कंपनीला फोन केला पण त्यांनाही प्रॉब्लेम सोडवता आला नाही व त्याने श्रीमहाराजांच्याकडे बोट दाखवले.
खरंतर दादा मला यामध्ये न सहभागी करून घेताही वेबसाईटचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकला असता पण त्याची कृपा की त्याने मला ह्यात घेऊन माझ्या हे लक्षात आणलं की त्याला कुठलाच प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट घडवून आणण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. त्याने नुसती ईच्छा/संकल्प केल्यावर प्रत्यक्ष भगवंत ती ईच्छा पूर्ण करायला आतुर असतो.
ह्या त्याच्या अवस्थेची जाणीव मला सतत राहो ही त्याच्याच चरणी प्रार्थना.
सद्गुरूनाथ महाराज की जय!
नमस्कार.
जय श्रीराम
25-09-2020 05:28 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका.