जय श्रीराम
नमस्कार.
एका साधिकेने श्री दादाला विचारलं की, “भगवंत हा सहज साध्य
आहे आणि सुलभ साध्य नाही, म्हणजे काय?” त्यावर श्री दादा म्हणाला, “श्रीमहाराज असं म्हणत
आहेत की, भगवंत हा आंम्हाला फक्त भगवंतासाठी हवासा
वाटावा अशी साधकाच्या मनाची नैसर्गिक अवस्था (नॅचरल स्टेट) असावी. जसा निसर्ग आहे. जसं झाड
आपल्याला सावली देतं, फळं देतं पण त्याबदल्यात आपल्या
कडुन काहीही अपेक्षा ठेवत नाही. किंवा बऱ्याच संतांनी नदीचं उदाहरण दिलं आहे. ती
जशी सगळ्यांना पाणी देते आणि त्या पाण्याचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो.
पण नदी कधी अपेक्षा ठेवत नाही की, माझं पाणी अमुक एका
कारणासाठीच वापरले गेले पाहिजे. भारतात सगळ्या नद्यांमधे पवित्र मानली जाणारी गंगा
नदी असं म्हणत नाही की माझ्या पाण्याचा उपयोग सांडपाणी म्हणुन न होता फक्त
देवाच्या पुजेसाठीच झाला पाहिजे. जसं जमीन एक दाणा पेरल्यावर हजारो दाणे परत देते. निसर्ग जसा फक्त देतच
असतो, तसा निरपेक्ष परमार्थ आम्ही केला पाहिजे. हा खरा
मार्ग आहे. असा निरपेक्ष परमार्थ करणे हे मला स्वभावत: आलं पहिजे.
हाच आपला खरा/मूळ स्वभाव आहे पण ‘खोटया मी’च्या अस्तीत्वामूळे (अभिमान) आपल्याला ईतर गोष्टींची गरज भासते. त्यामुळे
भगवंताविषयीची ओढ तितकीशी उत्कट रहात नाही. आम्ही म्हणतो आम्हला मायेची, मायेच्या विविध
रूपांची *आणि* भगवंताची सुद्धा ओढ आहे. तेव्हा निसर्ग जसा नेहमी निरपेक्षपणे देतो
तसे आम्ही निरपेक्षपणे परमार्थ केला पाहिजे. जसा निसर्ग नेहमी फक्त देण्याचाच
विचार करतो तसे आपण नेहमी फक्त भगवंताला निरपेक्षपणे देण्याचा / अर्पण करण्याचा
विचार करावा. हा भगवंताकडे जाण्याचा नैसर्गिक / सहज मार्ग आहे. भगवंताकडे
जाण्यासाठी कुठला सोपा (काहीही प्रयत्न न करता प्राप्त होईल असा) मार्ग नाहीये.
परमार्थामध्ये शॉर्टकट्स नाहीत. जर भगवंताबद्दल ओढ सतत वाटावी असा आमचा स्वभाव
बनला तर परमार्थ सोपा, सुलभ होईल.
काहीजण विचारतात की दिवसातुन एकच चॅन्ट केला तर भागेल का? किती जप केला
म्हणजे सद्गुरू भेटेल? ई. आपण प्रपंचामध्ये बरेच कष्ट घेतो.
आता पहा, एक कॉलेज डिग्री मिळवण्यासाठी तब्बल १५-१६ वर्ष
शिक्षण घेतो. पण परमार्थाच्या बाबतीत मात्र थोडं केलं की 'काहीतरी अनुभव यायला
पाहिजे, किंवा देवाचं दर्शन व्हायला पाहिजे, इतक्यात कसं नाही होत?' असं म्हणतो. आज प्रपंचात
इतक्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्या सोयी वापरण्याची, प्रत्येक गोष्ट चटकन मिळवण्याची आम्हाला सवय झाली आहे की. तीच सवय किंवा
तेच तत्वज्ञान आम्ही परमार्थात लागू करू पाहतो. मला भगवंताचं दर्शनही चटकन झालं
पाहिजे असे म्हणतो. ते होईलही पण त्यासाठी भगवंत सुद्धा हे पाहतो की, तू खरच फक्त मला उत्कट भावनेने, तळमळीने आठवतोस का? तू सतत माझ्या नामात, स्मरणात असतोस का?
जर का खरंच तशी उत्कट तळमळ, प्रेम आणि भाव, सतत फक्त भागवंताबद्दल असेल तर भगवंत समोर उभा राहील ही खात्री बाळगा. श्रीमहाराज नेहमी
म्हणतात, तुम्ही प्रपंचातल्या एक चतुर्थांश कष्ट जरी
भगवंतासाठी घेतलेत आणि त्यात प्रपंचात असते तशीच उत्कट भावना, तळमळ, कष्ट असतील तर भगवंतापर्यंत पोहोचता येईल. बऱ्याचदा साधक आवश्यक तेवढे
कष्ट घेऊन साधन करतो ही, पण त्यानंतर लगेच तेवढ्याच
आस्थेने तो प्रपंचात लक्ष घालतो ईथे सर्व चुकते. हे साधकाला व त्याच्या साधनेला खूप घातक आहे.”
मला ह्यातून ही लक्षात
आले की, मी
परमार्थ कशासाठी करतो आहे हे एकदम पक्कं मनात ठसवलं पाहिजे. एकदा ठरलं की त्यासाठी
मनापासून भरपुर प्रयत्न केला पाहिजे. थोड्याशा प्रयत्नानी साध्य होईल ईतका परमार्थ
सोपा नाहीये. नाम हे केवळ नामासाठीच घेतलं पाहिजे. त्यात भगवंताबद्दल तळमळ आली
पाहिजे. त्यामध्ये प्रापंचिक गोष्टींची अपेक्षा ठेवता कामा नये. साधना
व्यतिरिक्तचा वेळ आवडीने (प्रपंच करण्यात वाया न घालवता) भगवंताच्या अनुसंधानात
घालवला पाहिजे. मला प्रपंचातले अनुभव हेच सांगतात कि, तो कितीही आवडीने, गोडीने करून मी कधीच पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. मग, माझ्यासाठी एकच उरतं, जे आपले सद्गुरू सांगतात
ते पूर्ण श्रद्धेने केलं मात्र पाहिजे. त्यांना नाम आवडतं, ते आवडीने घेतलं कि झालं.
नमस्कार
जय श्रीराम
25-09-2020 12:43 am / POSTED BY : Kanchan Ganu / Where the Experience took place : व्हर्चुअल सत्संग - अमेरिका