जय श्रीराम
नमस्कार.
आम्ही नितीनदादाला विनंती करून काही दिवस त्याच्या घरी (अमेरिकेत) सत्संगासाठी गेलों होतो. मैथिली (मुलगी) लहान होती.
प्रत्येक दिवशी दिवसभर सत्संग चालणार असल्याने मैथिलीला करमणुक म्हणून तिला आवडत
असलेल्या चित्रकलेचे साहित्य आम्ही सोबत घेतले होते. हॉलमध्ये सत्संग चालू असताना मैथिली त्याच हॉल मध्ये बसुन चित्र काढत
होती. तिने श्रीमहाराज व श्रीराम यांचे चित्र काढायला घेतले होते. त्या
चित्रामध्ये श्रीमहाराज डोळे मिटून अर्धपद्मासनात बसले आहेत, हातात माळ आहे व श्रीराम त्यांच्या जवळ खाली बसून
त्यांच्याकडे पहात आहेत असे दाखवले होते. मैथिलीने तिचे चित्र पूर्ण केले पण तिला
श्रीरामांचे पाउल काढणे कठीण होत असल्यामुळे तिने तिच्या चित्रात श्रीरामांनी पायात मोजडी घातली आहे असे दाखवले
परंतु मुळ चित्रात श्रीरामांच्या पायात काहीच घातलेले नाही असे दाखवले होते. तिने
पूर्ण झालेले चित्र नितीनदादाला दाखवले. दादाने चित्र पाहिले व म्हणाला, "प्रत्यक्ष श्रीराम जरी असले तरी श्रीमहाराजांच्या
समोर पायात मोजडी घालून बसणार नाहीत." आम्हाला ते ऐकून खुप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर
दादाचॆ त्याच्या सत्गुरुंबद्दलचे अत्युच्य प्रेम, अत्युच्य आदर व आयुष्यात असलेले अत्युच्य स्थान हे
जाणवले. अर्थात हे सगळे आम्हाला सत्गुरुभक्ती शिकवण्यासाठी होते.
पुढे बऱ्याच काळानंतर दुसऱ्या एका सत्संगात
भगवंताच्या रूपांविषयी बोलताना दादाने आम्हाला सांगितले की भगवंताचे सर्व प्रथम
रूप म्हणजे परब्रह्म / परमात्म-तत्व जे की निर्गुण-निराकार आहे. त्याच्या नंतरचं
रूप म्हणजे ईश्वर (सगुण रूप) जे फक्त तीन गोष्टी करते - विश्वातील प्रत्येक जीवाचं
प्रत्येक क्षणातलं प्रत्येक कर्म साक्षीरूपाने बघून त्या सर्व कर्मांची नोंद करणे, त्या कर्माला कोणतं फळ कुठे, कधी व कसं द्यायचे हे ठरवणे व
त्याप्रमाणे ती वेळ आली की तशी परिस्थिती तयार करून ते देणं. ह्या रूपात फक्त कर्तव्य असतं. त्या नंतरचं रूप
म्हणजे त्याचे अवतार; श्रीराम, श्रीकृष्ण ईत्यादी. ह्यात ईश्वरी सर्व गुण असतातच
पण बरोबर अत्यंत निर्भेळ
प्रेमही (कृपा) असतं. दादा पुढे म्हणाला की संत हे भगवंताच्या परब्रह्म रूपाशी /
परमात्म-तत्वाशी एकरूप झालेले असल्यामुळे ते त्याच्या ईश्वरी अवतारापेक्षाही
श्रेष्ठ असतात. कारण अवतार हे धर्म
स्थापनेसाठी अवतीर्ण होतात
व संत मात्र जड जीवांचं कल्याण करण्यासाठीच येतात. त्यामुळे संतांना
अवतारांपेक्षाही संचितक्रमात बदल घडवायची ताकद व सवलत असते. हे ऐकल्यावर दादाने पूर्वी मैथिलीच्या चित्रावर केलेल्या भाष्याचा संदर्भ
लागला. सत्गुरुंचे वर्णन करताना श्री. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात - गुरु हा संतकुळीचा राजा. म्हणजे सगळे संत जरी सारखे असले तरी
साधकाच्या दृष्टीने आपले सत्गुरू हे सर्व संतांमध्ये श्रेष्ठ असतात.
ह्या
सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असे वाटले की माझ्या अंनत जन्मांच्या पुण्याईने
मला या जन्मात नितीनदादाच्या रूपाने सत्गुरू लाभले आहेत. भगवंताच्या सगुण
अवतारांपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या सर्व संतांमध्येही माझ्यासाठी ते श्रेष्ठ आहेत.
त्यांनी मला आपले म्हंटले आहे ही त्यांची माझ्यावर केवढी मोठी कृपा! त्यामुळे मी
त्यांना अत्युच्य प्रेम, अत्युच्य आदर व आयुष्यात अत्युच्य
स्थान देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक जन्मात त्यांच्या देहाची
संगत लाभेल की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे ते सांगतील त्या प्रमाणे तंतोतंत
आचरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करून याच जन्मात त्यांच्या संगतीचा जास्तीत
जास्त फायदा आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी करून घेतला पाहिजे. माझ्याकडून या
दृष्टीने मनापासून प्रयत्न होवोत, त्यांच्या नामात प्रेम येवो हीच
सत्गुरुंचरणी प्रार्थना.
नमस्कार.
जय श्रीराम
04-09-2020 07:49 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका