जय श्रीराम
आदरणीय सद्गुरू दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
२०१७ मध्ये दादा भारतात आले व त्या दरम्यान अभिजीत (माझा दीर) पण भारतात आला होता. त्या वेळेस दिवाळीच्या दरम्यान गोव्यामध्ये १५-२० दिवस दादांचा सत्संग होता. अभिजीतने मला गोव्यात सत्संगासाठी येणार का असे विचारले, आणि मी गोव्याला गेले. तेंव्हा दादांचा खूप जवळून सहवास मिळाला. प्रवचनांच्या विश्लेषणातून सद्गुरू भक्ती कशी करावी, रामनाम कसे घ्यावे, प्रपंच करताना परमार्थ कसा करावा, अनाहत नाद म्हणजे काय ? त्याचा अनुभव, मनाला प्रपंचातून परमार्थाकडे कसे वळवायचे ह्या आणि ह्या सारख्या अनेक विषयांवर संवाद झाला / शिकवण मिळाली.
दादा म्हणाले की नाम घ्यायला बसल्यावर महाराज व आपल्यामध्ये पर्सनल मीटिंग चालू आहे असे समजून प्रपंचातील विचार मनात आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचाला कमी महत्व देऊन नामस्मरणाला प्राधान्य द्यावे.
दादांना भेटण्यापूर्वी आयुष्यात घडलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांचा मनावर खूप परिणाम होत असे व प्रापंचिक तक्रारीही असत. आयुष्यातील बऱ्या वाईट घटना घडण्यामागे इतर लोक कारणीभूत आहेत अशी समजूत होऊन मी स्वतःला खूप मनस्ताप करून घेत असे व त्याचा दोष नशीब व परमेश्वरालापण दिला जात असे. ह्याबाबत मनाची खंत दादांना बोलून दाखवल्यानंतर दादांनी मला समजावून सांगितले की आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही सद्गुरुंच्या इच्छेनेच घडते व ती आपल्या भल्यासाठीच असते. ह्या शिकवणीमुळे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच दादांनी बदलला. दादांची शिकवण मनाला इतकी भावली की त्यांच्या कृपेने व ते माझ्याकडून करवून घेत असलेल्या रामनाममुळे पुढे घडलेल्या बऱ्या वाईट गोष्टीचा परिणाम मनावर आधी इतका होत नाही हे जाणवू लागले व त्यांच्याच कृपेने आपले लक्ष रामनामात गुंतवावे असे वाटू लागले. प्रपंचातील गोष्टींना महत्व न देता दादा माझे मन हळू हळू परमार्थाकडे वळवत आहेत. प्रपंच करत असताना परमार्थ कसा करावा ह्याची खुबी दादांनी दाखवून दिली.
सद्गुरू आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. त्यांच्याइतके निस्वार्थ प्रेम कोणीच करत नाही वा करू शकत नाही असे दादा नेहमीच सांगतात. ह्याचा प्रत्यय दादांनी दिला. दादांकडे जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभावच नाही. आम्हाला दादांच्या निवासस्थानी गाडीने सोडायला व न्यायला जे ड्राइवर काका येत असत ते ख्रिस्ती धर्मीय होते. दादा रोज स्वतः गाडीजवळ जाऊन त्यांना प्रसाद देत असत. पाऊस पडत असेल तर आम्हाला छत्री घेऊन स्वतः सोडायला येत असत. दादांच्या मिळालेल्या जवळच्या सहवासातून त्यांचे आपल्यावर असलेले निस्वार्थ प्रेम व प्रत्येक जिवाच्या कल्याणासाठी असलेली कळकळ अनुभवायला मिळाली.
आपल्या सद्गुरुंना रामनाम हेच अत्यंत प्रिय आहे. ते आपण मनापासून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांची खरी सेवा ठरेल. आत्तापर्यंत धार्मिक बाह्यउपचारांना जास्त महत्व दिले गेले, त्यामुळे खऱ्या भक्तीबद्दलचा हा विचार मनात आलाच नाही पण दादांनी रामनाम हीच सर्वश्रेष्ठ भक्ती, सेवा व तेच खरे साधन याची शिकवण देऊन परमार्थाचा मार्ग सोपा करून दिला. हळूहळू दादांबद्दल अधिक ओढ निर्माण होऊ लागली. असे बरेच पारमार्थिक अनुभव त्यांनी दिले.
हे सगळे प्रसंग मनाला आनंद देणारे व खूप शिकवणारे होते. दादा जे सांगत होते तेच आमच्या आधीच्या गुरुमाई पण सांगत असत, पण ते ह्याआधी कधी कळलेच नाही. ह्याबद्दल मी दादांना एकदा विचारले की दादा जे आत्ता मला कळते आहे ते ह्याआधी का कळले नाही ? तेंव्हा दादांनी महाराजांच्या ईच्छेने तुझे काम इकडे होणार आहे असे सांगितले. दादांनी इतके स्पष्ट सांगूनही माझ्या मनात काही प्रश्न होतेच. त्यासाठी दादांनी एक दिवस वेळ देऊन माझ्या मनातल्या शंका दूर केल्या व मला मंत्रदीक्षा दिली.
खऱ्या अर्थाने मला माझी अनंत जन्मांची सद्गुरुमाऊली (आई) लाभली.
धन्यवाद दादा
जय श्रीराम
04-09-2020 01:08 am / POSTED BY : Manisha Agnihotri / Where the Experience took place : गोवा