।।जय श्रीराम ।।
दादा २००७ मध्ये गोव्याला असतांना त्यांच्याबरोबर नंदाकाका आणि प्रफुलमावशींबरोबर (गायतोंडे दांपत्य) राहायला होते. तेंव्हाची गोष्ट -
तेंव्हा नंदकाका 'देव म्हणजे काय' ते शोधत होते व ही सुवर्ण संधी त्यांनी उचलायची ठरवली. त्यांच्या दादांच्या बरोबर ह्या बाबतीत गप्पा सुरु झाल्या. एका रविवारी सकाळी भगवंताला भावना शुद्ध पाहिजे ह्या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर दादा व नंदाकाका आंघोळीला गेले. नंदकाका आंघोळ करून दादांच्या अगोदर २-३ मिनिटे आधी पोहोचले तर त्यांनी देवापुढची उदबत्ती पेटलेली बघितली. त्यावर त्यांनी प्रफूलमावशींना विचारलं. तेव्हा त्यांनी नितीन अजून आलाच नाहीए व त्या स्वतः तिथे उदबत्ती कधीच लावत नाहीत कारण ते काम नितीन करतो असं उत्तर दिलं. हे संभाषण संपेपर्यंत दादा खाली आले व विचारल्यावर म्हणाले कि मनातल्या मनात त्यांनी उशीर झाल्याबद्दल महाराजांची माफी मागत आंघोळ करत असतांनाच मनातल्या मनात त्यांची पूजा केली व तेंव्हा उदबत्ती लावली. दादा म्हणाले महाराजांनी माझी पूजा स्वीकारली असावी व नंदकाका व प्रफुलमावशींसाठी पण त्याचे उदाहरण द्यायचे ठरवले. नंदाकाका त्यावेळेस शास्त्रज्ञांच्या विचारसरणीत असल्याने त्यांनी त्यावर एक आठवडाभर शोध घेतला कि ती उदबत्ती अचानक कशी लागू शकली? पण त्याला वैज्ञानिक किंवा तर्कशुद्ध उत्तर मिळाले नाही.
ही गोष्ट सांगत असतांना नंदाकाका म्हणाले, “त्यावेळी माझा तर्क पार कोसळून पडला. (I was completely shattered)” त्यावर दादा म्हणाले, “त्यावेळी महाराजांनी नंदाकाकांना पूर्णपणे बदलायचं ठरवलं असावं. त्यामुळे त्यांच्यासमोर त्या उदबत्तीने पेट घेतला. ते विचार करत राहिले कि त्या जागी नेमकी किती एनर्जी एकवटली असेल? हे आपोआप कसं घडत असेल? इत्यादी इत्यादी पण जो या सर्व आसमंताचा निर्माता आहे, सर्व शक्तींचा मालक आहे, त्याला अशक्य काय आहे? ते चैतन्य सर्वत्र भरून राहिलेलं आहे. त्याला कुठेही आणि कितीही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात प्रगट होता येईल. जो शास्त्राच्या नियमांचा निर्माता आहे तो नियमांच्या पलीकडच्या गोष्टी, तर्काच्या पलिकडच्या गोष्टी, आपल्या कल्पनेच्या पलीकडच्याही गोष्टी घडवतो.
तो हे चमत्कार नंदाकाकांच्या समोर एवढ्यासाठीच घडवत होता कि त्याला नंदाकाकांच्यात कायमचा बदल करायचा असावा. ह्या दृश्याच्या दुनियेच्या मागे कार्य करणाऱ्या अदृश्य शक्तीची कल्पना एकदा पक्की झाली कि त्याची आठवण ठेवणं, स्मरण करणं सोपं जातं. महाराजांना नंदाकाकांच्यात तो बदल घडवायचा होता. बघा, एका जीवाच्या कल्याणासाठी सुद्धा महाराज किती मेहनत घेतात ते.”
दादांच्या या सांगण्यावर विचार करताना डोळे पाणावतात. महाराज आपल्यासाठी काय काय करतात याची एक भलीमोठी यादी डोळ्यासमोर येते आणि मग मन आपल्यालाच प्रश्न विचारतं, "महाराज तुझ्यासाठी इतकं करतात आणि तू त्यांच्यासाठी काय करतोस? कमीत कमी त्यांना आवडतं म्हणून नाम घ्यायला काय हरकत आहे? कां होत नाही तुझ्याकडून?” आपल्याकडे याला उत्तर नसतं केवळ महाराजांकडे बघून अपराधी भावनेने हात जोडले जातात. कृतज्ञतेचे दोन अश्रु टपकतात.
कधी कधी हीच भावना तीव्र होते. स्वतःचाच राग येतो. मीच मला प्रश्न करतो, "भोवतालच्या चैतन्याच्या सादाला प्रतिसाद म्हणून ती नीर्जीव उदबत्ती पेटून उठते. पण त्या चैतन्याची जाणीव किमानपक्षी बुद्धीने झालेला तुझ्यासारखा सजीव मात्र पेटून उठत नाहीस. तू असा विझलेला राहतोस? कां पेटत नाहीस?”
।।जय श्रीराम ।।
13-08-2020 09:36 pm / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : गोवा व पुणे