।।जय श्रीराम ।।
एका साधिकेने दादांना सत् ग्रंथाचे वाचन करावे किंवा नाही असा प्रश्न विचारला. तेंव्हा दादांनी त्याचे उत्तर देताना म्हटले, “आपले जे गुरु असतील त्याचे गुरुत्व मनाला आधी पटवावे. ते मनाला पूर्णपणे पटले कि मग त्यांनी सांगितलेले साधन, त्यांनी सांगितले तसे, काहीही कमी किंवा जास्त न करता करावे व करायला सोपे जाते. आपल्या महाराजांनी नामस्मरण करायला सांगितले आहे. महाराजांचे गुरुत्व मनाला पटले कि त्यांनी सांगितलेले नामस्मरण हे एकच साधन खरे तर आपण करू. शिवाय त्यांनी नामस्मरणाला कोणतीही उपाधी जोडलेली नाही. अगदी माळेची सुद्धा नाही. अंघोळ झाल्याशिवाय जप करू नये असे सुद्धा म्हंटलेले नाही. कोणतेही आसन, कोणतीही वेळ, कोणतीही शारीरिक अवस्था अशा कशाचीही उपाधी त्यांनी नामाला जोडलेली नाही, तेंव्हा आपण तशा नामस्मरणाचा मार्ग स्वीकारावा आणि ते करावे हे आपले पहिले कर्तव्य.
परंतु आपल्याला सर्व वेळ नामस्मरण करणे जमत नाही, म्हणून नाईलाज म्हणून इतर साधनांकडे पहावे.
महाराजांनाही अर्थात ह्याची कल्पना असल्याने त्यांनी आपल्याला सदग्रंथ वाचन चालेल म्हणून सांगितलं आहे. त्यामागे त्यांचा उद्देश हा आहे की आपण तो वेळ दुसरं काही वाचण्यात / करण्यात घालवू नये. पण जमत असेल तर नामस्मरणाचाच आग्रह मनापाशी धरावा. इतर कोणतेही साधन नामस्मरणाला पर्याय म्हणून पाहू नये. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या साधनाला सर्वोच्च मूल्य हवे. जेंव्हा ते शक्य नाही म्हणून आपण इतर गोष्टींकडे वळणार असे वाटेल तेंव्हाच इतर साधनांचा विचार करावा."
नामस्मरणाच्या साधनाचे इतके महत्व सांगून झाल्यावर दादांनी एक आणखी विचार सांगितला, ते म्हणाले, "शिवाय एकदा आपण नामाशिवाय दुसरे कोणतेही एक साधन करू लागलो कि मन तिथेही स्वस्थ राहात नाही. दासबोध वाचला तर आता थोडावेळ ज्ञानेश्वरी पहावी, गीता पहावी, भजन करावे असे पर्याय मन सुचवत राहतं आणि कोणत्याही ठिकाणी स्थीर राहात नाही. त्रयोदशाक्षरी मंत्राचा चॅन्ट करावा तर त्याची चाल सुद्धा बदलावीशी वाटते. मग नविन, मनाला आवडेल अशी चाल शोधण्यासाठी आम्ही यु ट्यूब वगैरे वर तासंतास घालवतो.
हे असे एकातून अनेकाकडे आपल्याला नेणे ही माया आहे. ते आपण ओळखावे. माया अशी आपल्याला खेळवते; तिच्या सापळ्यात आपण सापडू नये. आपल्याला एकातून अनेकाकडे नाही तर अनेकातून एकाकडे जायचे आहे हे मनाला समजवावे. अनेकातून एकाकडे जाणे म्हणजे मायेच्या विरुद्ध एका भगवंताकडे जाणे आहे. भगवंत हेच आपलं ध्येय आहे.”
त्यादिवशीचं दादांचं सांगणं किती मोलाचं, किती उपयोगाचं, किती सूक्ष्म आहे हे का सांगायला हवे?
।।जय श्रीराम ।।
09-08-2020 07:17 pm / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : पुणे