जय सतगुरु जय श्रीराम
नितीनने तेजसला (माझी मुलगी) सांगितलं, PhD साठी अमेरिकेला जाण्याआधी, अर्नाळा मधील रामाला नमस्कार करून ये. म्हणून, मी व तेजसने एका रविवारी सकाळी ७ ची विरार लोकल पकडली. निघताना, श्रीरामाना २, सीतामाईना २, आणि लक्ष्मणाला २, अशा पुरणपोळ्या घेतल्या. गाडीने मिरा रोड स्टेशन सोडलं आणि लक्षात आलं, अरे! आपल्या हनुमंताला काहीच घेतलं नाही. आता पुरण पोळी सारखी वस्तू लगेच कशी मिळणार? आणि भक्ताला मिळाल्या शिवाय, देव तरी कसा खाणार? अशी मनाला सारखी चुटपुट लागली. आणि पुढच्या स्टेशनला, एक विक्रेती बाई चढली. आमच्या पर्यंत आली आणि म्हणाली, 'घ्या ताई, गरम गरम पुरण पोळ्या आणल्या आहेत.' मी चक्कर येऊन पडायची बाकी होते. आम्ही २ पुरण पोळ्या घेतल्या. त्या खरंच गरम होत्या व सुंदर प्लास्टिक मध्ये सिल्ड होत्या. मन शांत झाले. लगेच पुढच्या स्टेशनवर, ती बाई उतरून ही गेली.
मजा म्हणजे, हा अनुभव लिहिताना नितीनने जाणीव दिली की, ती विक्रेती बाई, दुसरी तिसरी कोणी नसुन, खुद्द नितीनच होता. कारण त्याचं सांगणं आहे, महाराज पारमार्थिक इच्छा पूर्ण करतात.
असाच आणखीन एक अनुभव - स्थळ - चार्लस्टन, अमेरिका २०११
तेजस MUSC, चार्लस्टनमध्ये PhD करत असताना, मी तिच्याकडे २ महिने राहायला गेले होते. तेजस, गुरुमाईंच्या एका सत्संग ग्रुपमध्ये जॉईन झाली होती. ७-८ फॅमिलीज मिळून तो ग्रुप होता. महिन्यात २-३ शनिवार/रविवारी सत्संग असायचा. आरती, चॅन्ट, पारमार्थिक चर्चा अशी मेजवानी असायची. तेजस मला पण न्यायची. एका रविवारी संध्याकाळी, सत्संग एका रिमोट एरिया मध्ये होता. तिथून निघायला रात्रीचे ८:३० वाजले. तेजसने गाडी स्टार्ट केली पण GPS लागेना तरी तेजसने बघुया म्हणून गाडी चालवायला सुरुवात केली आणि कुठेतरी टर्न चुकला. थोड्या वेळाने तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणाली, असेच पुढे ३ तास गेलो की आपण ग्रीयरला नितीनमामाकडे पोहोचू. नितीन व इंदिरा तेव्हा गोव्यात होते. तेजस मजा करत होती. दोघीही अजीबात घाबरलो नव्हतो ही पूर्णपणे त्याची कृपा. कारण रस्ता चुकलेला आणि रात्रीचे १० वाजले होते. आता पाहिला मॉल किवा पेट्रोल पंप दिसला की गाडी थांबवू. अमेरिकेत एक्स्प्रेस हायवेवर जास्त मॉल किंवा पेट्रोल पंप नसतात, असे म्हटले आणि लगेच पेट्रोल पंप दिसला. तिथे पेट्रोल द्यायला कुणी माणूस नसतो त्या मुळे सर्व शुकशुकाट होता. दूर ४-५ माणसे उभी होती. आम्ही शांतपणे GPS नीट स्टार्ट होईपर्यंत गाडी थांबवून ठेवली व नंतर व्यवस्थित घरी आलो.
पण मुख्य मजा म्हणजे, जेव्हा मा (प्रेमाआत्या) आणि मी, नितीनकडे, गोव्याला (आके) राहायला गेलो तेव्हा मी हे सर्व त्याला सांगितले, आणि तेव्हाच त्याने मला म्हणायला लावले, पण लगेच राईट साईडलाच पेट्रोल पंप कसा आला? नितीन मस्त दिल खुलास हसत होता. ओ हो! म्हणजे अख्खा पेट्रोल पंपच नितीनने आमच्यासाठी वसवला.
हे अनुभव जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा तेव्हा तो जाणीव देतो की तो एवढी अनुभूति देतो आहे पण मी मात्र त्याला काहीच देत नाही आणि मग तो जोरात नाम सुरू करून देतो.
धन्य धन्य मी सतगुरु तुलाच शरण आले नितीन
जय सतगुरु जय श्रीराम
मीना तिरोडकर
19-07-2020 02:01 pm / POSTED BY : Meena Tirodkar / Where the Experience took place : मुंबई २००५