।। जय श्रीराम।।
साधकांने सत्संगात विचारलेल्या प्रश्र्नावर पू. नितीनदादांनी दिलेल्या उत्तरावर आधारीत.
'नामस्मरण भक्ती मध्ये आत्मनिवेदन आणि पादसेवन कसं येईल?'
आत्मनिवेदन - कोणाचं निवेदन आहे? तर ‘आतल्याचं’. आतमध्ये कोण आहे बरं? ‘मी’; जो ‘त्याचा/भगवंताचा’ अंश आहे. तर त्या ‘मी’चं निवेदन काय असेल बरं?
‘मला तुझ्याकडे यायचं आहे.’ आणि दुसरं काहीच नाही. जन्मोजन्मी आमचं एकच ध्येय आहे. ते पुरं करण्यासाठी नामस्मरणाची भक्तीच योग्य पडते. त्याच्याकडे जो अखंड नाद (त्याचं एक स्वरूप) चालू आहे, तोच नाद आपल्यामधेही चालू आहे; आपण त्याचेच अंश असल्यामुळे.
खऱ्या अंशाचं/आत्म्याचं निवेदन काय बरं असेल? आईपासून बाजूला झालेलं अगदी लहान मूल जसं आईसाठी आक्रंदत असतं तसंच हा त्याचा अंश ‘मी तुझा आहे. मी तुझ्या पासून बाजूला झालो आहे. ते मला नकोय. मला घरी पोहोचायचंय / तुझ्यात मिसळून जायचं आहे, जसा मी पूर्वी होतो’. हे आक्रंदत असतो. हेच त्याचं निवेदन.
महाराज म्हणतात ना की "नाम (वैखरीपासून सुरु झालेलं नाम / आत चाललेला नाद) आणि भगवंत वेगळे नाहीत". त्यामुळे नामस्मरण चालू असते तेंव्हा एका प्रकारे आत्मनिवेदनच सुरू असतं, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. हल्लीच्या काळात ‘मी कोण आहे’ ह्याचा सतत विचार करत राहणं आणि ऐहिक आयुष्य जगणं कठीण आणि एखाद्याने त्याबाबतीत नुसता विचार केला किंवा त्याचा पुस्तक वाचून, प्रवचनं ऐकून अभ्यास जरी केला तरी प्रश्न अनुत्तरितच राहिल त्यापेक्षा नाम घेऊन प्रचितीद्वारे उत्तर मिळण्यात पूर्ण समाधान आहे. म्हणून आपण सतत नामात असावं व सद्गुरू कृपेने प्रचिती घ्यावी.
पादसेवन भक्ती - आमच्या गुरूच्या चरणांची भक्ती करावी, कारण त्यामध्ये सबंध विश्व भरलेलं आहे ही भक्तांची भावना (अनुभव नाही तोपर्यंत भावनाच म्हटली पाहिजे). मी नमस्कार करतो तेंव्हा माझं डोकं तुमच्या पायाच्या पातळीचं आहे असं मी स्वतःला सांगतो (तेही खरं अवाजवी महत्व दिलंय). डोकंच का? कारण आमच्या दृष्टीने माझं सर्व ज्ञान, प्रतिभा, लौकिक, वगैरे तिथे साठवलेलं आहे म्हणून. खरं तर डोकं नसून ते मन पाहिजे. मन महाराजांच्या चरणी चिकटवलं तर डोकं म्हणजे त्यातील बुद्धी असणं वाईट नाही कारण ते डोकंच त्यांच्या चरणावर मन कसं चिकटून राहील ह्यासाठी वापरलं जाईल. जो त्याचा योग्य उपयोग असेल. महाराज/सर्व संत आम्हाला हेच करायला सांगत आहेत की तू मन भगवंताला पूर्णपणे अर्पण कर मग शरीराने संसार केलास म्हणून काहीच बिघडत नाही.) बरं, आता दुसरा प्रकार त्या पायांची सेवा भौतिक सेवा करावी म्हटलं तर ती त्यांची भौतिक सेवा झाली. पण आज मला ह्या भौतिक जगातूनच सद्गुरू दिसतात, बोललेलं ऐकायला देतात, त्यांचा प्रसाद दिलेला खाता येतो, वगैरे, मग मला त्यांच्या पायाची भौतिक सेवाही करायला पाहिजे. म्हणून मग त्यांचे पाद्यपूजन, पाय चेपून देणं, वगैरे त्यात येतं. पण हे सर्व करतांना ते कोण आहेत हे विसरू नये म्हणून नामस्मरणंच उपयोगी पडतं.
माझे सद्गुरू फक्त सगुण नाहीत तर ते त्याच वेळेस निर्गुणही आहेत हे आज ह्या भौतिक बुद्धीनेच माहित आहे. मग तुमच्या पायाच्या धूलिकणासमोर माझी बुद्धिमत्ता, श्रीमंती/समृद्धी, शक्ति, विद्वत्ता, काहीच नाही हा विचार डोक्याने करायचा आहे. ही शरणागतीच. ती अवस्था यायला आम्ही अशी आठवण सतत ठेवली पाहिजे, की हे (माझे सद्गुरु) सर्व बाबतीत सर्वांमध्ये कायमचे मोठे आहेत. ती आठवण आजच्या काळात सतत कशाने राहील? तर नामाने. म्हणून नामस्मरणासारखा दुसरा सोपा उपाय नाही. 'हृदयी असावे चिंतन। मुखी अखंड नाम।’
अखंड चिंतन सुरुवातीलाच होऊ शकत नाही त्यासाठी मनाची घडण बदलली पाहिजे. घडण बदलायलाही आणि बदलेपर्यंत नामस्मरणंच करावं लागतं. हळू हळू सद्गुरू कृपेने नामस्मरणात इतर सर्वांचा विसर पडू लागतो म्हणजेच साधक नामापासून विभक्त राहत नाही त्याच्यात भक्ती जन्मते व तो नामस्मरणाने नामाचा भक्त होतो. असो.
म्हणजे एकूण काय तर नामस्मरण हीच भक्ती आणि ती भक्तीच मुळाशी भरलेली आहे म्हणजेच सर्व भक्तींचा अविभाज्य घटक आहे. म्हणून मूळ पाया जर भक्कम झाला तर इतर भक्ती त्याच्यावरंच आधारलेल्या असल्याने फलदायी होणार. प्रत्यक्ष पाय समोर असोत वा नसोत, ‘पायावर डोकं म्हणजे सर्वस्व तुम्हाला दिलं’ची धारणा ठेवावी, व ती धारणा सतत नामाने अखंड जळत ठेवावी मग आपली सर्व प्रकारची सेवा एका नामस्मरण भक्तीनेच भरून निघते.
।।जय श्रीराम।।
25-06-2020 06:35 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : ३०/०४/२०२० - झूम सत्संग, मुंबई