जय श्रीराम
साधकांने सत्संगात विचारलेल्या प्रश्र्नावर पू. नितीनदादांनी दिलेल्या उत्तरावर आधारीत.
'तळमळ आणि आर्तते मधे काय फरक आहे?'
मला तळमळ असते पण कसली? महाराज भेटावे, गोंदावल्याला जावं, नाम चांगलं व्हावं, वगैरे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही करत असतो. पण ती तळमळ कशी आहे ? ती थोडावेळ टिकते कारण परत संसाराचं काही सुरू झालं की ही (परमार्थाची) तळमळ कमी होते आणि संसाराची वाढते. हा आमचा प्रॉब्लेम असतो. म्हणून आमची ‘ही’ (परमार्थाची) तळमळ नेहमीच टेम्पररी असते.
आज आमची प्रपंचातील तळमळ लक्षात घेतलीत तर तीत आर्तता आहे हे लक्षात येईल. पण तीही टेम्पररी आहे.
प्रपंचात आर्तता कधी बरं दिसते ? कठीण परिस्थिती आली, आमच्या आवाक्याच्या पलीकडचं, जे नको आहे ते सगळं काही व्हायला लागलं कि आर्तता येते. ‘महाराज वाचवा. ह्यातून कधी बाहेर काढाल? म्हणून’. अतिशय तळमळीने (आर्ततेने) आपण तेंव्हा सांगत असतो.
आत्यंतिक तळमळ म्हणजे आर्तता. तळमळीचं एक एक्स्ट्रीम टोक म्हणजे आर्तता. आर्तता म्हणजे कायमची तळमळ, आणि तीही अत्युच्च भावाची. ती टिकते.
प्रपंच्यामधे परिस्थिती चांगली झाली कि आमची आर्तता कमी होते; ती वरवर दिसत नाही, पण आतमध्ये सुप्तपणे जागी असते की माझा प्रपंच सुरळीत चालावा. मला काय पाहिजे ते, पाहिजे तेंव्हा मिळत जावं. माझ्या लोकांचही सर्व बरं व्हावं. (पण ते बरंही कसं असतं कि जोपर्यंत त्यांचं बरं माझ्या आड येत नाही तोपर्यंत). असो.
महाराजांनी एक जरी अलौकिक, दैवी अशी आतमधली अनुभूती किंवा बाहेरचा चमत्कार म्हणा, जे काही दिलं तर मग परमार्थातील / नामाची आर्तता येते. तरी बाहेरचा चमत्कार हा ऐहिक जगातला असल्यामुळे आपल्याला आलेला तो आवेश तेवढा टिकत नाही, जेवढी आतली अनुभूती टिकते. आणि आतली एक जरी अनुभूती मिळाली तर मग ती आर्तता वाढत जाते. मग ती थांबत नाही. कारण ती आतली अनुभूती कशी असते कि बाहेरची परिस्थिती आहे तशीच आहे पण जप करत असतांना आतमध्ये जे काय वाटतं ते एवढं विलक्षण असतं की जपातून उठावसंच वाटत नाही, दुसरं काही करावसं वाटत नाही आणि नुसतं वाटत नाही असं नव्हे तर जीव करतच नाही. म्हणतो माझ्या लौकिकाचं जे काय होईल ते होऊ दे, मी या जपामधून उठणार नाही, अशी अवस्था येते. ती आर्तता मग आणखी वाढायला लागते. कारण ती खरीच कारणाशिवाय आलेली असते.
कारणाशिवाय जे आहे ते महाराजांकडून आलेलं आहे. कारणाशिवाय समाधान, कारणाशिवाय आनंद हा सगळा भगवंत कृपेची खुण आहे. सगळी खरी पारमार्थिक कृपाच, त्या खालची प्रापंचिक कृपा.
आम्ही सगळे प्रापंचिक कृपा मागतो. पारमार्थिक कृपा ज्याच्याकडे आहे त्याला प्रापंचिक कृपा होत असलीच पाहिजे. त्याला पारमार्थिक कृपा एव्हढया वरच्या स्तरावर नेते की त्याला प्रापंचिक कृपा असली काय आणि नसली काय दोन्हीचं काहीच वाटत नाही. आम्ही प्रापंचिक कृपाच करवून घ्यायला बघतो, मग पारमार्थिक कृपा होत नाही.
म्हणून त्यांना म्हणावं, ‘तुम्ही (स्वतः) या, प्रॉब्लेम नका सोडवू, तुम्ही येऊन थांबा माझ्याकडे, एकत्र आपण सहन करू प्रॉब्लेम.’ ते कारणाशिवाय कृपा करणारे आहेत, मग ते सहन करायला कसं देतील बरं. ते म्हणतील, ‘मी असताना मी कसं सहन करायला देऊ तुला?’ ‘तू मानतोस ना मी तुझ्याबरोबर आहे मग त्रास नाही.’ म्हणून मग ते म्हणालेत बघा, ‘भगवंत भोग सवडीने भोगायला देतो.’ ते आपल्याबरोबर आहेत ह्याची खुण आहे ही. हा फरक असतो. म्हणून ते बरोबर असण्यासाठी हा सगळा खटाटोप.
ते बरोबर आहेतच पण मला जाणवत नाहीत, त्यांची ‘ओ’ (माझ्या नामाला दिलेली) ऐकू येत नाही म्हणून हे सगळं करावं लागतं आणि एकदा ‘ओ’ ऐकू आली की मग वाटतं, अरे एवढी गोड ‘ओ’ कुणी दिलीच नाही या आयुष्यात. मग परत परत त्यांची ‘ओ’ ऐकू यावी, म्हणून आपण आणखी आणखी करत राहतो.
जय श्रीराम
23-06-2020 09:31 pm / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : १९/०२/२०२० - सत्संग, मुंबई.