जय श्रीराम
दादांना माझा प्रेमाचा नमस्कार.
आपण मायेच्या प्रभावात नकळत कसे भरकटतो आणि सद्गुरू येऊन आपल्याला कसे सांभाळतात ह्याचा हा अनुभव. अमेरिकेला जाऊन आता मला ३ वर्षे झाली होती आणि जरा अमेरिकेची हवा लागली होती. तिकडे थंडी खूप असल्याने जास्तीत जास्त वेळा पॅन्ट, शर्ट (पाश्चात्य कपडे) घालावे लागायचे. मग पॅन्ट वर कुठे टिकली चांगली दिसते! अशा विचाराने कपाळाला टिकली लावणे सोडून दिले. पुढे नोव्हेंबर २००७ मध्ये दादांकडे सत्संगासाठी गेलो होतो. हिवाळा असल्यामुळे गरम कपडे, पॅन्ट, शर्ट हाच पोशाख आणि टिकली लावलेली नाही.
घरी गेल्यावर रात्रीचा जेवण प्रसाद घेऊन झाला. तिथेच डाईनिंग टेबलकडे बसलेलो असताना दादा मला अतिशय प्रेमाने म्हणाले, "पल्लवी, आपण आपल्या पूर्व कर्माने कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे मागितलेले असते तेव्हा आपण टिकली आणि मंगळसूत्र नेहमी लावावं." त्यानंतर त्यांच्याच कृपेने पुन्हा टिकली लावण्याविषयी मनात कधी शंका आली नाही. माझे झालात म्हंटल्यावर मग माझ्या माणसाकडून चुका होऊ नये याची काळजी त्यांनाच असते. मला आज विचार केल्यावर असे वाटते कि त्यावेळी मी फक्त दादांकडे जायचे म्हणून जर टिकली लावली असती तर कदाचित माझ्याकडून पुढे असेच दिखाऊ वागणे झाले असते पण तिथेही दादांनी वाचवले.
दादा नेहमी प्रेमानेच आपली चूक दाखवून देतात पण कधीतरी (जरूर असेल तर) जरा कडक शब्दात पण सांगतात हेही पुढे दाखवून दिले.
काही वर्षांपूर्वी मला वेगवेगळ्या design ची मंगळसूत्रे आपल्याकडे असावी अशी फार इच्छा होती. मी एक दोन वेळा ते उद्योग करून झाले होते. एका सत्संगाच्या वेळी (दादांच्या घरी) असेच हॉल मध्ये बसलो होतो. दादा लॅपटॉपवर काहीतरी करत होते. आम्ही सगळे काही न बोलता बसलो होतो. काही विषय नाही, कुणी काही प्रश्न विचारलेले नव्हता. अचानक माझ्याकडे बघून रागावलेल्या आवाजात जरा मोठ्यानेच म्हणाले, "कशाला पाहिजेत इतकी मंगळसूत्रं? किती नवरे आहेत?" मला तर काहीच कळेना, दादांचा तो स्वर ऐकून भीती वाटली. नेहमी प्रेमाने ऐकायची सवय होती ना! पण क्षणात नंतर काहीच विषय नाही त्याबद्दल, सगळं नॉर्मल आवाजात बोलणं सुरु झालं. मला वेगवेगळे मंगळसूत्र घेणे हि माझी फक्त एक आवड आहे असा माझा समज होता पण मी त्यात किती अडकले आहे हे दादानाचं माहित होतं. मग त्यांच्या कृपेनेच ती आवडही हळूहळू कमी होत गेली. आपल्याला ज्यावेळी ज्या पद्धतीने समज मिळणे गरजेचं असतं तशाच प्रकारे त्यांचा तो आविष्कार असतो.
दादा नेहमी जे सांगतात कि सद्गुरुंचे आपल्यावर सतत काम सुरु असते ते हे असे. दादा वेगवेगळ्या प्रसंगातून मला शिकवत असतात आणि परमार्थाच्या मार्गामध्ये अडसर करणारे माझे दोष, चुका ह्यांच्यातून परावृत्त करत असतात. THANK YOU DADA.
सद्गुरूनाथ महाराज की जय
जय श्रीराम
10-06-2020 05:18 pm / POSTED BY : Pallavi Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर , अमेरिका