जय श्रीराम
नमस्कार
नितीनदादाची परमार्थ शिकवण्याची खुबी काही औरच आहे. ती इतरत्र कुठेही अनुभवायला मिळणार नाही अशी आहे. तो त्याच्या वागण्यातून, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला परमार्थ शिकवत असतो. आणि ते सुद्धा ज्याला ज्या रीतीने भावेल त्या रीतीने शिकवतो. अशीच दादानी मला शिकवलेली व मला अतिशय भावलेली एक गोष्ट शेअर करत आहे.
ग्रीअरला दादाच्या घरी सत्संग चालू होता व आम्ही सगळे हॉल मध्ये बसलो होतो. दादानी ऑडिओ सिस्टिमवर "रँडम" अभंग लावले होते. कोणतातरी एक अभंग चालू होता आणि तेवढ्यात माझ्या मनात काहीतरी प्रश्न आला. मी 'प्रश्न विचारू का?' अशा प्रश्नार्थक नजरेने दादाकडे बघितले तेव्हा दादा म्हणाला "बोल". मी प्रश्न विचारायला सुरुवात करणार तेवढ्यात दादानी मला थांबवले व म्हणाला या अभंगामध्ये आता एक छोटीशी चॅंट (नामसंकीर्तन) आहे ती करतो मग तू प्रश्न विचार. दादानी ती काही सेकंदांची छोटी चॅंट केली आणि मग मी प्रश्न विचारला. मला दादाचे हे वागणे व त्यातून दिलेली शिकवण एवढी भावली की ती मनात खोलवर रुजली. नाम घेण्याची छोट्यातली छोटी संधी सुद्धा वाया घालवू नकोस ही ती शिकवण होती.
श्रीमहाराजांच्या कृपेने दादा नामाच्याही पलीकडे असलेल्या शुद्ध परमात्मस्वरूपाशी/परब्रह्मतत्वाशी एकरूप झाला आहे. त्याचा अजपा-जप अखंड चालू असतो. त्याला वैखरीने (मुखाने) नाम घ्यायची काहीच गरज नाही. असे असताना सुद्धा मला नामाचे महत्व पटावे म्हणून काही सेकंदांची छोटी चॅंट करून त्यानी मला ही शिकवण दिली. त्याचा हा कळवळा बघून मन भरून आले. श्री. तुकाराम महाराजांनी आपल्या "माऊलीचे चित्त । जाणे लेकुराचे हीत ।।" या संतांविषयी लिहिलेल्या अभंगातील "ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ।।" या ओळींचा तो प्रत्यय होता.
दादाकडून ही शिकवण या प्रसंगा आधी व नंतर सुद्धा कितीतरी वेळा मिळाली आहे तरी सुद्धा आजही तसे वागण्याचा आपल्याकडून १००% प्रयत्न सुद्धा होत नाही आणि वेळ मिळताच मन विषयाकडे धावते हे बघून खंत वाटते व स्वतःचा राग सुद्धा येतो. पण यामुळे खचून न जाता दादा सांगतो त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत रहाणे हाच यावर उपाय आहे असे मनाला समजवण्याचा प्रयत्न चालू आहे.
सत्गुरुनाथ महाराज की जय!
नमस्कार
जय श्रीराम
07-06-2020 12:36 am / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका