जय श्रीराम
२९ मे २०२०
मी विक्रम, नितीनदादांचा मुलगा.
आईला काहीतरी स्कॅन करून पाहिजे होतं म्हणून जेवून घेतल्यावर मी लगेच त्या कामाला लागलो. नवीन कोरे कागद प्रिंटरमध्ये घालून मी प्रिंटरच्या समोर जमिनीवर बसलो. मी प्रिंटरवर स्कॅनचं बटण दाबलं आणि... कागदांपैकी वरचा कागद प्रिंटरमध्ये खेचला गेला आणि अडकला व स्कॅनिंग पूर्णपणे थांबलं. मला खरोखर याचं आश्चर्य वाटलं; माझ्या बरोबर असं ह्या पूर्वी कधीच झालं नव्हतं ! हे स्कॅनिंग करण्याचे काम मी अनेक वेळा पूर्वी केलं आहे आणि बहुतेक वेळेस मी सगळं फटाफट करत असे.
डोक्यातली चक्रे आता गरगर फिरू लागली होती - काय झालं असेल ? आणि कसा काढणार मी हा कागद ? मग मी प्रिंटरचे ट्रे उघडून, त्यात हात घालून त्या अडकलेल्या कागदाला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, प्रिंटर पुन्हा ऑफ आणि ऑन करून बघितलं, तरी तो कागद तेथल्या तेथेच. मग तो कागद फाटू लागला आणि माझा हात पोहचू शकेनासा झाला. ही भीती पण होती की, आता हे स्कॅन झालं नाही तर आईचं काम अडकेल, आणि केवळ माझ्या घाईमुळेच ! आता काय ? पुढे काय करावं मला सुचेना.
हे सगळं होत असताना, त्याच सुमारास आईला कोणाचा तरी फोन आला आणि जेव्हा मला तिचं बोलणं ऐकू आलं तेव्हा मला समजलं की ती पपांशी बोलत आहे. ते दोघे डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून मी न बोलता लांबून आईला इशारा केला की कागद प्रिंटरमध्ये जॅम झाला आहे. आणि मी समोर प्रिंटरकडे वळून तो कागद काढण्याचा प्रयत्न पुनः सुरु केला. मग अचानक उठून आई हातामध्ये फोन घेऊन माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. ती पपांना बोलली - "थांब, मी दाखवते. फोनचा कॅमेरा वळवू दे म्हणजे मग विक्रम दिसेल." आईच्या हे बोलण्यावरून मला कळलं की तिने पपांना माझ्या गोंधळाबद्दल सांगितलं आहे. आईच्या हातामध्ये फोन असल्याने, मला फोनचा स्क्रीन दिसत नव्हता. आईने स्क्रीनवर काहीतरी दाबलं आणि काही सेकंदातच...जणू काहिच प्रॉब्लेम नसल्यासारखा प्रिंटरने त्या क्षणाला त्या अडकलेल्या कागदाला इजेक्ट केलं, तो कागद माझ्या समोर जमिनीवर पडला, आणि प्रिंटर फ्री झाला !
हे पाहिल्याबरोबर आई एकदम मनापासून हसू लागली.
01-06-2020 04:58 am / POSTED BY : Vikram Samant / Where the Experience took place : ओहायो, अमेरिका