जय श्रीराम
आम्ही अमेरिकेत रहात असताना एकदा काही दिवसांच्या सत्संगसाठी नितीनदादाच्या गांवी - ग्रीअरला गेलो होतो व हॉटेल मध्ये रहात होतो. २७-जुलै-२०१७ रोजी नितीनदादाने मला व्हाट्स-ॲप मेसेज करून विचारले की माझ्यासोबत गोंदवल्याला मिळणारे नित्योपासनेचे पुस्तक आहे का. मी नाही असं म्हणून कळवलं तर खरं, पण मला या मागचा काहीच संदर्भ लागेना. आता दादाला कसे विचारणार की कशासाठी पाहिजे म्हणून. बरं तसं बघायला गेलं तर दादा अगदी सहज बोलताना सुद्धा वेद, वेदांग, शास्त्र, पुराण इत्यादि मधल्या श्लोकांचे नंबर व त्यांचा गुढार्थ अगदी सहजी सांगतो. असे असताना दादाला पुस्तकाची गरज ती कशासाठी. मी गप्प राहिलो पण मनात हुरहुर राहिली.
पुढे डिसेम्बर-२०१८ मध्ये दादा भारतात आला व २०१९ मध्ये दादाने श्रीमहाराजांची आरती व इतर काही पदे स्टूडीओ मध्ये स्वतःच्या आवाजात रेकाॅर्ड करून ती सर्व भक्तांसाठी जुलै-२०१९ मधे गुरुपोर्णिमेच्या दिवशी उपलब्ध करून दिली. आरती बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन सेवा करण्याचे भाग्य मुंबईच्या आमच्या एका नातेवाईकांना सुद्धा लाभले.
२०१९ साली आम्ही भारतात आल्यावर मला त्या नातेवाईकांकडून कळाले की आरती मधली काही पदे ही दादाने नित्योपासनेच्या पुस्तकातून निवडली आहेत! मला लगेचच २०१७ मधला प्रसंग आठवला व आश्चर्य वाटले की जूलै-२०१९ मधे लागणारे पुस्तक मला दादाने जूलै-२०१७ (२ वर्ष अगोदर) मध्येच मागितले.
एकदा गोव्याला सत्संग साठी गेलो असताना मी ही गोष्ट दादाला सांगितली. तेव्हा इंदिरा मला म्हणाल्या की २०१७ मध्ये जेव्हा दादानी मला पुस्तक मागितले तेव्हा त्याच्याकडे ते पुस्तक घरीच होते तरी सुद्धा त्याने माझ्याकडे पुस्तकाबद्दल विचारले. यावर दादा मला म्हणाला की महाराजांच्या कृपेने पुढे काय आहे ते कळतं पण ते वर्तमानात लागू पडत नसल्याने ईतरांशी त्याबाबत बोललो तर त्यांना त्याचा काहीच संदर्भ लागत नाही.
दादाची केव्हढी कृपा की त्यानी मला हा अनुभव दिला. त्यानी हे जर मला उलगड़ून सांगितलं नसतं तर माझ्या बुद्धीला हे कधीच कळलं नसतं. श्रीतुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात सद्गुरूंबद्दल म्हणतात तेच खरं -
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । ईतर तुळणे काय पुढे ।।
तुका म्हणे नेणे युक्तिचिया खोली । म्हणोनी ठेविली पायी डोई ।।
सद्गुरुनाथ महाराज की जय!
जय श्रीराम
30-05-2020 10:17 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका