माझा पहारा चा गोव्यातील अनुभव - समीर आलोणे
जय श्रीराम ..
नितीन दादांच्या कृपेने आणि श्री महाराज्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडून हा अनुभव लिहिणे होत आहे.
१ मार्च २०२० ची दुपार. मी पहारा अटेंड करण्यासाठी पुण्याहून गोव्याला गेलो होतो. मनात खूप उत्कंठा होती. पहिलीच वेळ होती पहारा अटेंड करायची. सर्व कसे महाराजांनी जुळवून आणले होते. बरोबर १.४० ला मी सभागृहात पोचलो. २६० चा काउन्ट होता त्या दिवशी. पण ना कुठे गडबड ना गोंधळ. दादांच्या देखरेखीखाली सर्व कसे एकदम चोख सुरु होते. बरोबर २ वाजता पहारा सुरु झाला. मी समोरून तिसऱ्या रो मध्ये बसलो होतो- साधारण दादांच्या समोर.
२० एक मिनिटे झाली असतील पहारा सुरु होऊन. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले होते. झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची सुरवात असावी ती. दादांच्या चरणांशी केलेली ती प्रार्थना होती – षडरिपू पासून मला सांभाळावे आणि माझ्यातील दुर्गुण काढून टाकावेत. सुरवातीची १९-२० मिनिटे माझा प्रयत्न सुरु होता की श्री राम जय राम जय जय राम जपावर पूर्णपणे लक्ष द्यायचा. नियमाप्रमाणे काही केल्या थांबायचे नाही. हळुवार आपल्याला ऐकू येईल ह्या आवाजात जप करायचा. डुलकी लागू द्यायची नाही. एकीकडे दादांना वरील विनंती सुरूच होती. तेवढ्यात माझ्या डाव्या गालावर प्रेमाने परिपूर्ण असा स्पर्श झाला, दादांचा तो सुगंध जाणवला आणि कपाळावर दादांनी हात ठेवून आशीवार्द दिला. आईचा मायेचा स्पर्श, नाही नाही, त्याहून ही प्रेमळ, जणूकाही मला सांगून गेला की अरे मी आहे ना.. ये जवळ ये.. जणू काही मला दादांनी पोटाशी धरले आणि मायेने जवळ केले .. ते दोन अलौकिक क्षण आणि डोळ्यातून अश्रू सुरु झाले..!! नंतर ची ४० एक मिनिटे कशी गेली नाही कळले. पण मन आताशा हलके झाले होते. असे वाटत होते की ह्याच अनुभवात राहावे. पुन्हा पुन्हा तो स्पर्श होत राहावा आणि दादाच्या कुशीत त्यांना बिलगून राहावे .. ६० मिनिटे संपली आणि डोळे उघडले. जणू काही स्वर्गीय अनुभव असावा. स्वप्नवतच.. जन्म जन्मांची पुण्याई असावी की दादा नी जवळ केले, चुका पोटात घातल्या आणि पुन्हा सांगितले - राम नामात रहा, सर्व ठीक होईल.
जय श्रीराम ..
24-05-2020 09:53 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : Goa