जय श्रीराम🙏
दिवस होता १३ जुलै २०२१चा. नितीनदादांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे रोज नामस्मरण करण्याचा प्रयत्न करित होते. आपण नामस्मरण करण्याचे मनात ठरवावे आणि श्रीमहाराज ते करवून घेतात असे दादांनी सांगितले होते. त्यादिवशी सकाळी नामस्मरणाच्या वेळी एक विलक्षण अनुभव श्रीमहाराजांनी दिला. नामस्मरण सुरू केले आणि नेहमीप्रमाणे मनात विचारही सुरू झाले. प्रकर्षाने प्रयत्न करीत होते की विचार येऊ नयेत पण शक्य होत नव्हते मग श्रीमहाराजांच्याच कृपेने वाटले विचार येणारच असतील तर आपण गोंदवल्यामध्ये आहोत, मंदिरात बसून नामस्मरण करीत आहोत असेच विचार जास्त येऊ द्यावे. आणि प्रयत्नपूर्वक असे विचार करीत असताना मन सगळ्या विचारांबरोबर फिरून आले आणि गोंदवल्याच्या मंदिरात श्रीमहाराजांच्या पादुकांपाशी बसून नामस्मरण करीत आहे असा अनुभव आला. तिथलेच वातावरण, सुगंध, क्वचितच मोगऱ्याचा सुगंध...प्रत्येक श्वासागणिक ते वातावरण जाणवत राहिले आणि डोळ्यातून पाणी यायला लागले. आपण फक्त विचार करावा आणि श्रीमहाराज आपल्याला प्रत्यक्ष गोंदवल्यात घेऊन जातात. बुद्धीच्या इतके आहारी गेले असल्यामुळे सुरुवातीला हे माझ्या मनाचे खेळ असावेत असे वाटले पण पुन्हा श्रीमहाराजांनी विचारांमध्ये येऊन हे जाणवून दिले की, मनाचे हे खेळ इतके सुंदर अनुभूती देणारे असतील आणि श्रीमहाराजांच्या जवळ नेणारे असतील तर का नको.
त्यादिवशी सकाळी सकाळी श्रीमहाराज गोंदवल्यात घेऊन गेले. असे नामस्मरण माझ्याकडून प्रत्येकवेळी करवून घ्यावे हीच श्रीमहाराजांच्या चरणी प्रार्थना.
जय श्रीराम 🙏
26-07-2021 06:13 pm / POSTED BY : Bhakti Pethkar / Where the Experience took place : ठाणे