जय श्रीराम
सद्गुरूनाथ महाराज कि जय
श्री. दादांना माझा प्रेमादरपूर्वक नमस्कार.
श्री. दादांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांच्या कृपेने मला सप्टेंबर २०१७ साली घडले आणि त्यांच्याच कृपेने नाम संस्काराला सुरुवात झाली. या वेळेस आम्हाला ५-६ दिवसांचा सत्संग घडला. नामाचे महत्व, सतत नामःस्मरण का करावे हे त्यांच्याच कृपेने थोडेफार कळाले. या कालावधी नंतर आम्ही मात्र नामा पासून दुरावलो. पण जसे आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम, काळजी, कळकळ असते, मुलांनी योग्य मार्गावर चालावे असे वाटतें, तसेच काही श्री. दादांनी आमच्या बाबतींत घडवून आणले.
नामा मध्ये काय ताकद आहे याची आम्हाला आठवण करून देण्यासाठी, आमची श्रद्धा बळकट करण्यासाठी श्री दादांनी एक अनुभव दिला.
मे -२०१८ मध्ये माझे सासरे - सुमंतराव जोशी यांच्या उजव्या पायाच्या एका बोटाला जखम झाली, त्यांना मधुमेह असल्याने ती चिघळून त्याचे रूपांतर गँगरीन सारख्या गंभीर दुखण्यात झाले. गॅंगरीन पूर्ण पायामध्ये वाढू नये म्हणून डॉक्टरांना ते बोट कापावे लागले. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नव्हती, म्हणून सासू आणि सासरे उपचारासाठी जुन-२०१८ मध्ये त्यांच्या गावाहून (अमरावतीहुन) पुण्याला आले. सासूबाईनी दादांना अमेरिकेत फोनवर हि बातमी कळवली. त्यावर दादांनी रामनामावर पूर्ण जोर द्यायला सांगितला. पुण्यात उपचार सुरु झाल्यावर त्याचाच एक भाग म्हणून सासऱ्यांच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करून तळ पायातील सेप्टिक काढण्यात आले. सासरे हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असतांना व डीसचार्ज मिळून घरी आल्यावरही माझ्या सासू (सौ. हर्षा जोशी) यांनी रोज सायंकाळी न चुकता श्री मारुती स्तोत्र, श्रीराम रक्षा आणि श्रीरामांचे गुणगान करायचे असा उपक्रम चालू ठेवला.
जानेवारी-२०१९ मध्ये अचानक पायातील संसर्ग वाढत आहे असे डॉक्टरांना आढळले, आता गुढघ्या पासून पाय कापण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाहीं असें आम्हाला सांगितले गेले. पण त्यांनी (सासू व सासरे) असे ठरवले कि आता जे काय करायचे ते अमरावतीला जाऊन तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्या प्रमाणे करूयात.
फेब्रुवारी-२०१९ ला ते अमरावतीला गेले. तिथल्या डॉक्टरांना पाय दाखवला, त्याबरोबर दादांशी फोनवर संवाद चालू होता व दादांचे सांगणे होते की नामाने महाराजांची कृपा होते व महाराजांना अशक्य काही नाही. पाय कापावा लागतो कि काय अशी भीती मनात होती पण जोडीला नामही चालू होते. आश्चर्य म्हणजे अमरावतीच्या डॉक्टरांनी पाय शस्त्रक्रिया न करता नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो असे सांगितले. त्याप्रमाणे उपचार सुरू केले. पाय हळू हळू बरा होत आहे हे पाहुन, श्री दादांच्या कृपेने सासरेही नाम घ्यायला लागले. कालांतराने नामाचा परिणाम दिसू लागला. जिथे पुण्याच्या डॉक्टरांच्या मते पाय गमवावा लागेल असे वाटत होते तिथे पाय नुसत्या औषधांनी बरा होत होता.
काही दिवसांनी डॉक्टरांनी पायाचा MRI स्कॅन करुन पायामध्ये संसर्ग असून तो टाचेच्या हाडा पर्यंत पोहचला आहे असे सांगितले. आता हाडाला गँगरीनचा धोका दिसू लागला म्हणून परत एक शस्त्रक्रिया करायची ठरविली, कि ज्या मधून संसर्ग कमी करणारे औषध हाडाला लावायचे असे ठरले. ठरल्या प्रमाणे डॉक्टर सासऱ्यांना ऑपेरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले, पण लगेच (५-१० मिनिटात) बाहेर आणले आणि म्हणाले कि हाडा जवळ काहीच संसर्ग आढळला नाही म्हणून शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. हे सर्व आम्हाला चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नव्हते.
या नंतर काही दिवसात संसर्ग कमी होत आहे पण पायाच्या जखमेवर नवीन त्वचा पाहिजे तशी वाढत नाही म्हणून नवीन त्वचा शत्रक्रियेने बसवू या असे डॉक्टरांनी सुचवले (skin transplant). त्या प्रमाणे त्वचातज्ञांची वेळ घेतली आणि तपासणीला गेले असता डॉक्टर म्हणाले कि शस्त्रक्रियेची आवश्यकताच नाही कारण नवीन त्वचेची वाढ व्यवस्थित होत आहे. पुन्हा एक चमत्कार!
नक्की काय होत आहे हे कळायला वेळ लागला. खरा डॉक्टर, खरे उपचार, खरे औषध काय होते हे "त्यांच्याच" कृपेने उमगू लागले. श्री दादांच्याच कृपेने डॉक्टरांच्या उपचाराला यश, औषधात गुण आला होता आणि खरे औषध म्हणजे श्री दादांनी दिलेले "रामनाम" हेच होय ह्यावर विश्वास बसू लागला व आम्हा सर्वांची सद्गुरू आणि रामनामावरील श्रद्धा वाढली.
श्री दादांच्या या कृपेने कुटुंबावरील आर्थिक ताण पण कमी झाला कारण साधारणपणे रु. १ लक्ष उपचार/शस्त्रक्रिया याचा खर्च वाचला.
श्री दादांचे नामःस्मरण आणि अनुसंधान टिकावे, नामाच्या ताकदीचे, सद्गुरूंच्या कृपेचे सतत स्मरण रहावे हिच त्यांच्या श्रीचरणी नम्र प्रार्थना!
श्रीराम जय राम जय जय राम!
जयश्रीराम दादा.
सद्गुरूनाथ महाराज कि जय
13-10-2020 07:16 pm / POSTED BY : vishal kapse / Where the Experience took place : अमरावती/पुणे २०१८-२०१९