।।जय श्रीराम।।
सद्गुरूनाथ महाराज कि जय,
श्री. दादांना माझा प्रेमादरपूर्वक नमस्कार.
साधकाने सतत नामामध्ये राहावे असं सद्गुरूंना अपेक्षित असतं, त्यासाठी ते हवी ती मदत करतात आणि वेळप्रसंगी विशिष्ट परिस्थिती तयार करवून आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची, कृपेची आणि संरक्षणाची जाणीव करवून देतात.
ऑगस्ट - २०१९, आमच्या कंपनी मध्ये कर्मचारी कपात झाली आणि माझ्या काही जवळच्या मित्रांना नोकरीवरून कमी केले. या कारवाईची बातमी मला आणि माझ्या मित्रांना एक दिवस आधी कळाली होती, पण आपल्या सोबत काय होणार हे काही कळत नव्हतं. कारवाईच्या पहिल्या दिवशी इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कमी केलं, तेव्हा मी आणि मित्र तणावा मध्ये होतो. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करीत होतो कि जे होईल ते चांगलेच होतील, श्री दादा सोबत आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०-११ च्या दरम्यान माझ्या मित्रांना वरिष्ठानीं बोलावून माहिती दिली कि त्यांना पण नौकरी वरून कमी करण्यात येत आहे. आता आपले काय होईल हि चिंता लागली होती. त्यावेळी जरी मी काही काळासाठी श्री दादांना विसरलो होतो, तरीही ते सोबत होतेच आणि माझ्यावर तशी वेळ येऊ दिली नाही. माझी नोकरी टिकवून ठेवली.
परिस्थिती थोडी शांत झाल्यानंतर मी विचार केला कि असे काय झाले असेल कि मी या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडलो? मी काही घटनाक्रम आठवू लागलो. एक वर्ष आधी म्हणजे २०१८ मध्ये मला विशेष प्रोजेक्ट्स मिळाले नसताना देखील माझे वार्षिक परफॉर्मन्स रेटिंग हे उत्तम श्रेणीत होते. २०१९ मध्ये पण विशेष प्रोजेक्ट्स मिळाले नव्हते. मी प्रयत्न करीत होतो कि एखादा चांगला प्रोजेक्ट मिळावा आणि त्यांच्याच कृपेने जून-२०१९ म्हणजे कपात होण्याच्या फक्त २ महिने आधी मला एका महत्वाच्या प्रोजेक्टवर घेण्यात आले (जेणे करून नोकरी जाण्याचा धोका अजून कमी केला). म्हणजे हे सर्व त्यांनीच घडवून आणलं जेणे करून माझ्या प्रपंचात अडचण येणार नाही, नाम घेण्यात आणि अनुसंधान टिकवण्याच्या प्रयत्नात बाधा येणार नाही. अगदी ऑफिसच्या वेळेतसुद्धा अनुसंधान राखणं शक्य आहे हे त्यांच्याच कृपेने आता पटलं आहे आणि त्यांच्याच कृपेने त्यादृष्टीनीं प्रयत्नही सुरु केलेत.
जानेवारी-२०२० मध्ये माझी मॅनेजर सोबत परफॉर्मन्स review मीटिंग (one-on-one ) झाली आणि यावर्षी पण रेटिंग उत्तम ठेवले आहे असं सांगितले. सोबतच निरोपपण दिला (रेटिंग बाबत) - "Vishal, senior management wants inform you that going forward it will not be easy, you should increase your visibility." मला हा निरोप त्यांच्याच कृपेने मिळाला आणि मी त्याचा असा अर्थ काढला कि मला अजून मेहनत घेतली पाहिजे/प्रयत्न केले पाहिजेत. माझी अशी श्रद्धा आहे कि हा निरोप मॅनेजरच्या मुखातून श्री दादांनीच दिलेला आहे. तसे जर असेल तर हा नुसत्या नोकरी/प्रपंचा पुरता मर्यादित नसून यात माझे पारमार्थिक भलं असलं पाहिजे. त्यांच्याच कृपेने कळलेल्या या निरोपाचा अर्थ मी असा घेतला कि सद्गुरूंच्याच कृपेने नोकरी टिकली आहे, चांगले रेटिंग मिळाले आहे याची सतत जाणीव ठेवून, सदगुरुंची सेवा म्हणून ऑफिसचे काम शक्य तितकं चांगलं करण्याचा मनापासून प्रयत्न करायचा म्हणजेच प्रयत्न कसुन होईल, काम करत असताना देखील हि त्यांची सेवा आहे असं अनुसंधानही राखलं जाईल. उरलेला सगळा वेळ नाम घेण्यात, त्यांच्या अनुसंधानात रहाण्याच्या प्रयत्नात घालवायचा जे कि माझ्या सद्गुरूंना अत्यंत प्रिय आहे.
खुप खुप धन्यवाद दादा, तुमच्याच कृपेने माझे अनुसंधान रहावे आणि सतत नामःस्मरण करवून घ्यावे हीच तुमच्या चरणीं प्रार्थना.
सद्गुरूनाथ महाराज कि जय.
।।जय श्रीराम।।
05-10-2020 11:10 pm / POSTED BY : vishal kapse / Where the Experience took place : २१ ऑगस्ट २०१९, पुणे