जय श्रीराम
नमस्कार
सत्संगात एका साधिकेने विचारले - साधनात आवड आणि तळमळ का येत नाही?
या प्रश्नाच्या नितीनदादाने दिलेल्या उत्तराचा निवडक भाग इथे मांडत आहे. दादा म्हणाला, "आवड लागली पाहिजे आणि ती लागली नसेल तर त्याचा अर्थ तो (भगवंत/सद्गुरू) कोणीतरी माझा खरंच हितकर्ता आहे, आधार आहे हे मनापासून पटलेलं नाही. अजुनही मी, माझे लोक, माझे पैसे वगैरे वगैरेंचा मला जास्त आधार वाटतो व ह्या गोष्टी असतील तर माझं हित होत आहे हे माणुस धरून चालतो.
तो आहे म्हणुन मी जगतो हे लक्षात येत नाही. एकदम धट्टाकट्टा माणुस गेला अशी बातमी आम्ही ऐकतो पण आपल्या असं मनात येत नाही की अरे माझ्याबाबतीत पण हे कधीही होऊ शकेल. उलट आपण असे विचार वाईट आहेत, अशुभ आहेत म्हणतो आणि आयुष्याची वास्तविकता बाजूला सारतो. पण ती वस्तुस्थिती जर जाणवली तर मग आपल्याला लक्षात येईल की मला दिलेल्या वेळेत मी माझ्या भल्याचं असं काही केलं पाहिजे की जे माझ्या खऱ्या मालकीचं असेल व जे मी पुढील जन्मांत घेऊन जाऊ शकेन. मला माहित नाही माझी जाण्याची वेळ कधी येईल म्हणुन मला साधनाचं खरं महत्व मनापासुन पटलेलं असलंच पाहिजे. अशी व्यक्ती मार्गावरून कधीही ढळणार नाही.
आज आपल्याला पैसा महत्वाचा वाटतो. जरा कुठे पैसा जास्त खर्च झाला की मनाला टोचणी लागते. पुढच्या वेळी जास्त लक्षपुर्वक व सतर्क राहिलं पाहिजे असं वाटतं. कारण पैशाची किंमत आपण आपल्या मनामध्ये कोरली आहे. पैसा 'असलाच पाहिजे' असं आपल्याला वाटतं. तसंच त्याच्याबद्दल 'असलाच पाहिजे' हा भाव असला पाहिजे. हा भाव मनातील ईतर गोष्टीबद्दलच्या 'असलाच पाहिजे' भावापेक्षा जास्त दृढ असला पाहिजे मगच तो मनावर बिंबवला जाईल. मग त्यांच्याबद्दलची तळमळ आपोआप येईल.
जर आपलं ठरलेलं साधन होत नसेल किंवा साधनात भाव, तळमळ येत नसेल तर आपण अस्वस्थ होऊ, साधनात अपुर्णता वाटेल, काहीतरी चुकतं आहे असं सतत वाटेल. यामुळे साधनातला आपला भाव अजुन दृढ होईल. साधनात सद्गुरूंशी नातं जाणवावं यासाठी आपण जास्त साधन करायला लागू. नातं सतत जाणवलंच पाहिजे असं वाटायला लागेल. हे आपल्या बुद्धीला समजतं पण ते मनात उतरलं पाहिजे. यासाठी आपण साधन करण्याच्या केलेल्या निश्चयाचं वारंवार चिंतन करावं. एका दिवसाचे ५ भाग करावे - सकाळी उठल्यापासून नाश्त्यापर्यंत, नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत, जेवणापासून चहा पर्यंत, चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत व जेवणापासून झोपे पर्यंत. या प्रत्येक भागात आपण माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय (मी माणूस म्हणून का जन्मलो?), त्यासाठी मी काय केले पाहिजे व कसे केले पाहिजे याची स्वतःलाच वारंवार आठवण करून द्यावी व ते करायचा अखंड प्रयत्न करत राहावा. हळूहळू ते आपल्या अंगवळणी पडेल. परमार्थ मार्गात मनाला शीस्त लावावी लागते. सर्व संतांनी स्वतःच्या मनाला हे (जीवनाचा खरा उद्देश) वारंवार सांगितलं आहे. हे आपल्याला त्यांच्या अभंगांतून व इतर साहित्यातून दिसतं. ते स्वतः त्याप्रमाणे तसं वागले आहेत. जर आपल्याला त्यांच्यासारखी कृपा व अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी सांगितल्या प्रमाणे आचरण करणे, ते ज्या मार्गाने गेले त्याचे अनुसरण करणे जरूर आहे. म्हणुन आपण केलं तर होईल नाही तर होणार नाही. त्याच्याबद्दलचीही तळमळ आपोआप उत्पन्न होणार नाहीए.
आपल्याला आजही तळमळ आहे. कसल्याही तळमळीशिवाय जगतो असा कोणीही नाही. आपल्याला आज मायेची, मायेच्या विविध रूपांची तळमळ आहे. म्हणुन जेव्हा मायेच्या त्या रूपांमध्ये काही खाली-वर होतं तेव्हा आम्ही अस्वस्थ होतो. तशीच अस्वस्थता परमार्थात आली पाहिजे. आपण आपलं साधन नियमित करत असतो त्यात आपल्याला भाव व तळमळ येत नसल्यामुळे वाईट वाटत असतं पण अस्वस्थता येण्याइतकं नाही. वाईट वाटतं याचा अर्थ हा की आपण बरोबर मार्गात आहोत. अजून जास्त साधन शक्य तितक्या दृढ भावाने करत राहा व तुम्हाला फरक दिसेल, तळमळ येत जाईल. हा सुद्धा एक सराव आहे. सातत्य, वारंवार करण्याने हे साध्य होईल व तो स्वतः बरोबर आहेच मदत करायला."
दादाचे हे बोलणे ऐकून मला वाटले की आपल्याला आपल्या जाण्याची वेळ माहित नाही, पुढचा जन्म मनुष्याचाच येईल की नाही हेही माहित नाही. जन्म मनुष्याचा आलाच तरी आज असलेली पोषक परिस्थिती, शरीरस्वास्थ्य, परमार्थ करण्याची बुद्धी तेव्हा असेल की नाही माहित नाही. असे असताना या मायेमध्ये अडकून स्वतःचेच नुकसान का करून घ्यावे? आज साधनात प्रेम, तळमळ नाही हे तर स्पष्टच आहे. दादाची रोज नुसती नामात प्रेम येण्यासाठी पार्थना करून का प्रेम येणार आहे?
ते काही नाही, दादा म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या सांगण्याचे सतत चिंतन, मनन केले पाहिजे आणि शक्य तितक्या दृढ भावाने व तळमळीने साधन करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाच पाहिजे.
नमस्कार
जय श्रीराम
19-09-2020 06:44 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : व्हर्चुअल सत्संग - अमेरिका