|| जय
श्रीराम ||
दादांना
भेटायला आलेले दाम्पत्य नुकत्याच झालेल्या त्यांच्या प्रवासातील अडचणींचे सविस्तर वर्णन सांगून त्यातून महाराजांनी त्यांना कसे सोडविले, कसे
ते सुखरूप घरी पोहोचले ते
दादांना सांगत होते. सगळं शांतपणे ऐकून
झाल्यावर दादा त्यांना म्हणाले,
“इतक्या अडचणीमधून महाराजांनी तुम्हाला सुखरूप घरी आणले. होय
ना? आता परत जेंव्हा
अशा एखाद्या अडचणीत तुम्ही सापडाल त्यावेळी ह्याची आठवण राहील कां?
महाराज आपल्याला सुखरूप घरी नेतील याची
खात्री आधीपासूनच वाटेल कां?” त्यांना तो प्रश्न अनपेक्षित
होता. ह्यावेळी महाराजांनी कृपा केली हे
सांगण्याच्या नादात पुन्हा अडचण येईल त्यावेळी
महाराजांवरील श्रद्धा ठाम असेल अशी
खात्री काही चटकन् त्यांच्याकडून
आली नाही.
दादा
म्हणाले, “आपले असेच होते.
ह्यावेळी महाराजांनी आपल्याला सोडविले याची आपली खात्री
होते पण पुढल्या वेळी
ते सोडवतील याची खात्री वाटत
नाही असे कां होते?
आपली श्रद्धा कमी पडते. खरेतर
ती अडचण आपलं महाराजांकडे
लक्ष जावं यासाठीच आलेली
असते. त्यातून सुटल्यावर महाराजांनी आपल्याला कशी मदत केली
व त्यातून सोडवलं ह्याचा विचार करून आपल्याला होणारा
आनंद याकडे लक्ष द्यायला हवं.
त्या आनंदा साठीच ह्या घटना महाराजंच
घडवत असतात.”
दादा
म्हणाले ते किती खरं
आहे. जेंव्हा ते संकट येतं
तेंव्हा ते महाराजांनी पाठवलेलं
आहे, त्यांची आठवण व्हावी म्हणून
पाठवलेलं आहे हे लक्षात
आलं तर संकट, अडचण
काळजी निर्माण करू शकणार नाही.
उलट महाराजांचे स्मरण होण्यासाठी ते एक निमित्त
होईल. पांडवांची माता कुंती हिने
श्रीकृष्णाकडे मला कायम दु:खात ठेव (कारण
त्यामुळे मी तुझं स्मरण
करीत राहीन) असा वर मागितला
तो यासाठीच असेल.
घडणारी
प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेनेच घडते. परमेश्वराची इच्छा कल्याणकारीच असते. ही आपली श्रद्धा
किती दृढ आहे यावर
आपल्याला काळजी, चिंता असणार की नाही व
असेल तर आपल्याला किती
त्रास देणार हे अवलंबून आहे.
त्यामुळे ‘देव करतो ते
भल्यासाठीच’ हे
लक्षात ठेवून पुढल्या संकटाच्यावेळी चिंता न करता महाराजांचे
चिंतन करू या. पण
हे अचानक आलेल्या संकटकाळी लक्षात राहत नाही ना,
म्हणूनच महाराजांनी सतत नामात राहायला
सांगितलं आहे.
।।जय
श्रीराम ।।
31-07-2020 07:05 pm / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : पुणे