।।जय श्रीराम।।
एका सत्संगात दादांना कुणी सांगत होतं कि शास्त्रज्ञ असं म्हणतात कि आपल्याला विश्वाचे फक्त अर्धा टक्का ज्ञान आहे. बाकी साडे नव्यांण्णव टक्के विश्व आपल्याला माहीत नाही. त्यावर दादा अचानक “तो म्हणतोय ते बरोबर असणं शक्य नाही”, असं म्हणाले. पुढे त्याचं स्पष्टीकरण देतांना म्हणाले, “अशी टक्केवारी सांगण्यासाठी आपल्याला आधी शंभर टक्के काय आहे याची माहिती हवी, त्याशिवाय टक्के कसे बरे काढता येतील? ती माहिती आपल्याजवळ आहे कां? परवाच कुठेतरी बातमी होती कि नासाने अवकाशात १ सेंटीमीटर चौरसावर लॉंग-रेंजची दुर्बीण १० दिवस रोखून धरली व मिळालेली माहिती तपासल्यावर त्यांना असं लक्षात आलं की तेवढ्याशा जागेत जवळ जवळ १००० आकाशगंगा आहेत. अशा माहीत नसलेल्या गोष्टी जर असतील तर आपल्याला शंभर टक्के कसे माहित असतील? त्यामुळे आपण अर्धा टक्का माहित आहे तरी कसं म्हणणार? आजचा अर्धा टक्का उद्या पाव टक्का ठरेल.”
दादा म्हणतात हा विचार किती खरा आहे. आज आपल्याला केवळ अज्ञानच आहे असं नाही तर अज्ञानचंही अज्ञान आहे. आपल्याला काय काय माहित नाही हे ही आपल्याला माहित नाही आणि अशा अनंत कोटी आकाशगंगेतल्या एका आकाशगंगेतल्या एका छोट्याश्या सूर्यमालेपैकी एका पृथ्वी नावाच्या लहान ग्रहावर मी एक क्षुद्र जीव आहे. खरोखर मी कुणीही नाही तरीही मी केवढा अभिमान बाळगतो!
दादा म्हणतात, “आपल्यापेक्षा सर्व गोष्टीत मोठे, श्रेष्ठ असे, कितीतरी लोक या जगात आहेत. आपल्यापेक्षा जास्त शिकलेले, आपल्यापेक्षा जास्त हुशार, आपल्यापेक्षा जास्त पैसेवाले, असे प्रत्येक क्षेत्रात आपल्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी असतात त्यामुळे आपण अभिमान बाळगण्याचे, गर्व करण्याचे काहीच कारण नाही.
आपल्याला अभिमानच बाळगायचा असेल तर म्हणावं कि माझा गुरु ह्या अनंत कोटी ब्रम्हांडांचा नायक आहे. त्याची सर्वज्ञता, सर्वशक्तीमानता, असीम करुणा, असीम उदारता, आणि हे आणि असे अनेक अमर्याद गुण असूनही अत्यंत नम्रता याचा अभिमान मी नक्कीच बाळगू शकेन. हे मिश्रण कसं आहे की ज्यात संपूर्ण विरोधी गोष्टी (सगळे अमर्याद गुण व नम्रता) महाराज लीलया वागवतात. अशा गुरुंचं मार्गदर्शन मला लाभत आहे, हे माझं महदभाग्य आहे. अशा विचारांनी एकाच वेळी आपली नम्रता आणि आपला अभिमान योग्य जागी, योग्य प्रमाणात राहतील. शिवाय गुरुंबद्दलचा आपला 'अहो भाव' वाढीस लागेल. त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाढेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण जास्त आदरभावाने आचरणात आणू आणि आपले कल्याण करून घेऊ.
।।जय श्रीराम ।।
25-07-2020 10:36 pm / POSTED BY : Shrikant Bhate / Where the Experience took place : पुणे