जय श्रीराम
आदरणीय सद्गुरू श्री दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
माझे पती उदय ह्यांचे मामेभाऊ अभिजीत कुलकर्णी जुलै २०१५ च्या शेवटी आम्हाला मुंबईत भेटायला आले होते. त्या वेळेस मी व माझे कुटुंब आधी एका सद्गुरू भक्ती मध्ये होतो. ते घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला नितीन दादांबद्दल आणि त्यांच्या सुगंधाबद्दल सांगितले व तुम्ही दर्शनाला येणार का असे विचारले. आम्ही आधीपासून एका सद्गुरुभक्तीमध्ये असल्यामुळे उदयने त्यांना नकार दिला. पण दादांची रचना काही वेगळीच होती.
दिनांक १ ऑगस्ट २०१५ रोजी ओंकारच्या (माझा मुलगा) एका कार्यक्रमाचे ठिकाण व दादांचे गझदर आश्रम हे अगदी जवळ असल्याने नितीनदादांच्या दर्शनाला आम्ही गेलो. त्यादिवशी दादांचे दर्शन व नामस्मरण झाले. त्या दिवशीच्या चॅन्टमध्ये खूप सुगंध भरून राहिला होता. दादांचे मनमोहक रूप, प्रेमळ वाणी व सुगंध ह्याने आम्हाला भारावून टाकले व पुन्हा पुन्हा दादांच्या दर्शनाला जावेसे वाटू लागले. एके दिवशी चॅन्टनंतर मी दादांना आम्हाला आपणासमोर संगीत सेवा सदारकरण्याची संधी मिळावी अशी विनंती केली. थोड्याच कालावधीत दादांनी संधी दिली व सांगितले की २ ऑक्टोबर २०१५ रोजी संध्याकाळी ५ वाजता तुम्ही संगीत सेवा सदार करण्यासाठी या.
त्याप्रमाणे मी व ओंकारने दिलेल्या दिवशी नितीन दादांच्या चरणी संगीत सेवा सादर केली. संगीत सेवा झाल्यावर दादांनी महाराजांना तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे असे सांगतिले. दादा म्हणाले की मी देत नाहीए महाराज देणार आहेत. असे म्हणून त्यांनी बाजूची उशी उचलून तिच्या खाली काही आहे का असं बघितलं तर तेथे काहीच नव्हतं. मग महाराजांकडे बघत ते म्हणाले, "परत बघू महाराजांना काय द्यायचं आहे ते." असं म्हणून त्यांनी परत त्याच उशीखाली हात घातला. बघतो तर काय! त्या सोफ्याच्या उशी खालून सर्वांसमोर ₹१०००/- ची नोट आली व ती दादांनी आम्हाला प्रसाद म्हणून दिली. मग समजले की दादांचे गुरु श्रीगोंदवलेकर महाराजही उशीखाली हात घालून पैसे काढून लोकांना देत असत. त्यादिवशी आम्ही खूप भारावून गेलो व नितीन दादांनी लक्ष्मीमातेच्या रूपाने आमच्या आयुष्यात प्रवेश केला. त्याआधी नेहमी आर्थिक अडचणी असायच्या. पण दादांनी दिलेल्या प्रसादामुळे आर्थिक अडचणी दूर होऊ लागल्या व नितीन दादांकडे चॅन्टला जायची ओढ वाढू लागली.
एकदा दादांनी प्रवचनात 'परमार्थासाठी माणसाने अडाणी असावे' असा उल्लेख केला व माझे आधीचे सद्गुरुदेखील हेच म्हणत. त्यामुळे मी दादांना ह्यावर विचारले असता, आमचं connection आहे असं दादा म्हणाले. त्यानंतर दादा म्हणाले की तुला चमत्कार पाहिजे होता ना? मग १००० ची नोट घेऊन कोण आलं होतं तुझ्याकडे? माझे आधीचे सद्गुरू देहात नाहीत व त्यांच्या शिष्या त्यांचे आश्रम चालवत आहेत. तिकडे खूप भक्तमंडळी सद्गुरु देहात असतानाचे अनुभव व चमत्कार share करत असतात. ते ऐकल्यावर मलाही सद्गुरूंनी चमत्कार दाखवावा व दर्शन द्यावे हि सुप्त इच्छा माझ्या मनात असे. दादांकडे आल्यावर त्यांनी ती माझी इच्छा पूर्ण केली व दादा आणि माझे आधीचे सद्गुरू एकच आहेत ह्याची प्रचिती दिली. अश्याप्रकारे दादांनी आम्हाला जवळ घेतले.
ह्या घटनेद्वारे दादांनी असे शिकवले कि जीवनात योगायोग मुळीच नसतो. सर्व काही सद्गुरूंच्याच इच्छेने होते व ते आपल्या भाल्याचेच असते.
दादांच्या चरणी प्रणाम.
सद्गुरूनाथ महाराज की जय
जय श्रीराम
26-06-2020 03:02 am / POSTED BY : Manisha Agnihotri / Where the Experience took place : मुंबई