आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य
मानावे. 'या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल.’ असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या
मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग ? ‘मला सगुण साक्षात्कार व्हावा’
असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे
दर्शन करून देऊन काय उपयोग ? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार ? सद्गुरूने
जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे, हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे
व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा
व्हावा म्हणणे, म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला ? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे
आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक
एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सद्गुरुवचनावर विश्वास ठेवला
म्हणजे सुखदु:खाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर
खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो, त्याप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने
वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा
सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा.