श्रीमहाराज, माझे सद्गुरू
ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की, माझ्यापाशी अनुग्रह घेणार्यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का ? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही; नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच, मी कुणाचे रक्षण करतो आहे असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे काय रक्षण करणार ? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात. कारण ती मोकळी असतात; त्यांना बंधन नाही. विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच, मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की, 'तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये,' तर तसे त्याला करता येणार नाही; त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये, आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे, लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते; पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही; म्हणून मी ते प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते, आणि नंतर, ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगाच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. 'मी तुमच्याजवळ आहे' असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून' परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे' असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे; तुम्हांला जे काही होईल, ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानीत नाही ? वास्तविक जे जे काही तुम्ही करताहात ते मीच करतो आहे, माझीच तशी इच्छा आहे, असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.